नागपूर : नागपूर म्हटले की गुळगुळीत, रुंद आणि सिमेंट रस्त्याचे चित्र डोळ्यापुढे येते. पण शहरात असे अनेक रस्ते आहेत ज्यांचे भाग्य फळफळायला अनेक वर्षे लागली. नागपूरचा जुना भंडारा मार्ग हा त्यापैकीच एक. या रस्त्याच्या रुंदीकरणाला चोवीस वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली होती. प्रत्यक्ष कामाला सोमवारी सुरुवात झाली.
चोवीस वर्षांपासून रखडलेल्या जुन्या भंडारा मार्गाचे काम सोमवारपासून सुरू झाले. या रस्त्याचे रुंदीकरण व्हावे यासाठी मध्य नागपूर विकास आघाडीचे अध्यक्ष भूषण दडवे व स्थायी समितीचे माजी अध्यक्ष रवींद्र पैगवार यांनी पाठपुरावा केला होता. ७ जानेवारी २००० मध्ये नागपुरातील ४५ डीपी रस्त्यांना मंजुरी मिळाली होती. यापैकी ४४ रस्त्यांचे काम पूर्णही झाले. फक्त जुन्या भंडारा रस्त्याचे काम रखडले होते. यासाठी मध्य नागपूर विकास आघाडीतर्फे मागील २४ वर्षांपासून संघर्ष सुरू होता. २०१४ मध्ये संघटनेने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. १९ जुलै २०१७ मध्ये नागपूर उच्च न्यायालयाने तीन महिन्यांत या रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले होते. परंतु त्यानंतरही आठ वर्षाने प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. खुद्द गडकरी यांनी वेळोवेळी महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन रस्ते बांधणीचे काम सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला होता.
हेही वाचा – नागपुरात मध्यरात्री इमारत कोसळली! दोन दिवसाआधीच मुश्ताक अहमद अन्सारी यांचे कुटुंब…
हेही वाचा – अंदाज ठरला खोटा, पाऊस आला मोठा! राज्यात आजपासून पुन्हा मुसळधार
दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्यासाठी केंद्र सरकारकडून १०० कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला. ७० टक्के निधी राज्य शासन देणार असून ३० टक्के रक्कम महापालिका खर्च करणार आहे. रस्ते रुंदीकरणाच्या कामात दोनशे पक्की बांधकामे तोडली जाणार असून ४१ जणांना २३ कोटी ९ लाख रुपये भरपाई मिळाली आहे, त्यांनी त्यांच्या मालमत्तांवरील ताबाही सोडला आहे.