प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची प्रियकरासोबत मिळून पत्नीने हत्या केल्याची धक्कादायक घटना अकोला जिल्ह्यातील पातूर येथे उघडकीस आली. पतीचा मृतदेह विहिरीत टाकून बेपत्ता झाल्याची तक्रार पत्नीने पोलीस ठाण्यात नोंदवली होती. पोलीस तपासात प्रकरणाचा उलगडा झाला. या प्रकरणी आरोपी पत्नी व प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे.
हेही वाचा- समृद्धी महामार्गाचे उद्घाटन होताच गेला पहिला बळी, महामार्गावर वाहनाच्या धडकेत…
पातूर तालुक्यातील आलेगाव येथील शाम खुळे यांच्या कार्ला शिवारातील शेतात बंडू आत्माराम डाखोरे (४५, रा.सावरगाव) हे कामासाठी पत्नीसह राहत होते. काही दिवसांपूर्वी बंडू डाखोरे बेपत्ता झाल्याची तक्रार पत्नी मीरा (३५) हिने पातूर पोलीस ठाण्यात नोंदवली. ९ डिसेंबर रोजी कार्ला शेतशिवारातील विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. वैद्यकीय अहवालात हत्या झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पातूर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासामध्ये पत्नी आणि तिच्या प्रियकराने हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
मीरा डाखोरे हिचे गजानन बावणेसोबत प्रेमसंबंध होते. पतीला याची कल्पना आली. त्यातून पती-पत्नीमध्ये वाद झाले. बावणे आणि मृत बंडू डाखोरे यांची मैत्री होती. दरम्यान, ते दोघेही हत्येच्या दिवशी सोबत दारू पिण्यासाठी शेतात बसले होते. गजाननने ओढणीच्या साह्याने बंडू डाखोरेंची गळा आवळून हत्या केली. आत्महत्येचा बनाव करण्यासाठी शेतातील विहिरीत मृतदेह टाकला. दरम्यान, पोलीस तपासात आत्महत्येचा बनाव रचून हत्या केल्याचे निष्पन्न झाले. पातूर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.