नागपूर : घरखर्चासाठी पैसे मागितल्यामुळे पतीने पत्नीचा पाळण्याच्या दोरीने गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी पत्नीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून आरोपी पतीला अटक केली. ही घटना अंबाझरी पोलिस ठाण्यांतर्गत उघडकीस आली. पोलिसांनी पीडित महिला प्रीती विश्वजीत ढोणे (३४) रा. वर्मा लेआऊट, अंबाझरी हिच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे. विश्वजीत सुशीलकुमार ढोणे (३९) असे आरोपी पतीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

सोमवारी दुपारी घरखर्चासाठी पैशांची आवश्यकता असल्याने प्रीतीने पती विश्वजीतकडे पैसे मागितले. त्याने खिशात पैसे नसल्याचे सांगताच प्रीतीने एटीएम कार्ड मागितले. मात्र यावरून विश्वजीत संतापला व त्याने पैसे आणि एटीएम कार्ड देण्यास नकार देत प्रीतीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

हेही वाचा : धावत्या रेल्वेतून सव्वा किलो दागिने लंपास; व्यापारी झोपेत असताना साधला डाव

त्यानंतर त्याने तिला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. तसेच लहान मुलीच्या पाळण्याच्या दोरीने प्रीतीचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केला. प्रीतीने कशीबशी त्याच्या तावडीतून स्वत:ची सुटका केली व थेट अंबाझरी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून विश्वजीतला अटक केली.

Story img Loader