बहिणीशी किरकोळ कारणावरून वाद झाल्याने घरातून बाहेर पडलेल्या एका ३५ वर्षीय महिलेवर भंडारा जिल्ह्यातील कन्हाळमोह जंगलात नेऊन तीन ते चार जणांनी बलात्कार केला. तिला निर्वस्त्र आणि बेशुद्धावस्थेत सोडून आरोपींनी पळ काढला. पीडित महिलेवर नागपूरमधील मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला पतीपासून विभक्त राहते. गेल्या काही दिवसांपासून ती गोंदिया जिल्ह्यात बहिणीकडे राहायला गेली होती. ३० जुलैला बहिणीशी किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यामुळे रागाच्या भरात तिने घर सोडले. तिला भंडारा जिल्ह्यात राहणाऱ्या आईकडे जायचे होते. ती रस्त्याने पायी जात असताना श्रीराम उरकुडे (४५, गोरेगाव) तिला भेटला. त्याने तिला कारने माहेरी सोडून देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे ती श्रीराम याच्या कारमध्ये बसली. त्याने तिला रात्रीच्या सुमारास मुंडिपार जंगलात नेले. तेथे तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने नकार देताच तिच्यावर जंगलात बलात्कार केला. रात्रभर तिला जंगलात ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी कारने घरी सोडण्याचे आश्वासन दिले. तिला सायंकाळपर्यंत सोबत ठेवले. एका ढाब्यावरून जेवण घेतले आणि पुन्हा कार जंगलाच्या दिशेने नेली. दुसऱ्या दिवशी श्रीरामने पुन्हा रात्रभर त्या महिलेचे लैंगिक शोषण केले. १ ऑगस्टला पीडित महिलेला कन्हाळमोह येथील जंगलात सोडून पळ काढला. ती महिला कन्हाळमोह रस्त्याजवळ असलेल्या धर्मा ढाब्याजवळ आली आणि तेथे एकटीच बसली होती. तिने तेथे एका पंचर दुरुस्ती करणाऱ्या व्यक्तीला पाणी मागितले आणि घडलेला प्रकार सांगितला.

मदतीच्या नावावर अत्याचार

पीडित महिलेला एका युवकाने दुचाकीने घरी सोडून देण्याचे आश्वासन दिले. तिने दुचाकीवर बसण्यास नकार दिला. मात्र, तेथील पंचर दुरुस्ती करणाऱ्या व्यक्तीने विश्वास ठेवायला सांगून दुचाकीवर बसण्यास सांगितले. त्यामुळे ती महिला त्या युवकासोबत निघून गेली. मात्र, काही वेळात त्या युवकाने जंगलात दुचाकी थांबवली आणि त्याच्या पाठोपाठ तो पंचर दुरुस्ती करणाराही तेथे पोहचला. दोघांनीही महिलेवर रात्रभर सामूहिक बलात्कार केला. तिला कन्हाळमोह जंगलात निर्वस्त्र आणि बेशुद्धावस्थेत सोडून त्यांनी पळ काढला.

गावातील महिलांनी कपडे दिले

कन्हाळमोह जंगलातून जात असलेल्या एका दुचाकीचालकाला एक महिला निर्वस्त्र आणि बेशुद्ध पडलेली दिसली. त्याने लगेच कारधा पोलिसांना फोन करून कळवले. पोलीस अधिकारी प्रशांत मिसळे, सौरव घरडे हे पथकासह पोहचले. तोपर्यंत गावातील महिलांनी तिला कपडे दिले. पोलिसांनी तिला त्वरित भंडारा येथील रुग्णालयात नेले. महिलेची प्रकृती बिघडल्यामुळे तिला नागपुरातील मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

Story img Loader