अकोला: सुमारे वर्षभरापूर्वी झारखंडमधून हरवलेल्या महिलेला तिच्या स्वत:च्या जिल्ह्यात पाठवून कुटुंबापर्यंत पोहोचविण्यापर्यंत महिला राज्यगृह व स्वयंसेवी संस्थांना यश आले आहे.
निराधार, निराश्रित, हरवलेल्या व पीडित महिलांसाठी शासकीय महिला राज्यगृह ही संस्था काम करते. वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे एक महिला भटकत असताना पोलिसांना एका वर्षापूर्वी आढळून आली. या महिलेला खडकी येथील शासकीय महिला राज्यगृहात दाखल केले. ही साधारणत: ४५ वर्षांची महिला अतिशय कमी बोलणारी, तसेच तिची वर्तणूक काहीशी मतिमंदासारखी व परराज्यातील असल्याने भाषेची अडचण होती. त्यामुळे तिचे मूळ घर शोधून काढणे हे आव्हानच होते. संस्थेचे प्र. अधिक्षक गिरीश पुसदकर हे समुपदेशनाच्या विविध पद्धतींचा अवलंब करत तिच्याकडून शक्य तेवढी माहिती घेतली. अधीक्षकांनी स्वत:च्या कुटुंबाचे छायाचित्र दाखवून तिला तिच्या कुटुंबाबाबत हावभावाद्वारे विचारणा केली. त्याला प्रतिसाद मिळून तिचे नाव व गावाची माहिती प्राप्त झाली.
हेही वाचा… नागपूर: लग्न करण्याचे आमिष देऊन तरुणीवर बलात्कार
गावाची माहिती मिळाल्यानंतर गुगलवर सर्च करून त्या गावातील शाळा, मंदिरे आदींची माहिती करून घेण्यात आली. त्या स्थळांची ओळख महिलेने दर्शवल्यानंतर सराईकेला जिल्ह्यातील ते गाव असल्याचे निश्चित झाले. त्यानंतर तेथील पोलिसांच्या माध्यमातून चौकशी करण्यात आली व महिलेच्या भावाशी संपर्क झाला. आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने महिलेला घेण्यासाठी येण्यास भावाने असमर्थता दर्शवली. त्यामुळे तेथील पोलीसांशी पत्रव्यवहार करण्यात आला. तथापि, परराज्यातील महिला असल्याने विशेष परवानगीची गरज होती. या प्रक्रियेत कालावधी लागणार होता. त्यामुळे सेराईकेला येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी ई-मेलद्वारे संपर्क साधण्यात आला. त्यांचा प्रतिसाद मिळाल्यावर महिलेला स्वत:च्या जिल्ह्यात स्थलांतरित करण्याचे निश्चित झाले. त्यासाठी चाईल्डलाईन यंत्रणा व जिल्हा बाल संरक्षण कक्षाची मदत घेण्यात आली. ‘चाईल्डलाईन’च्या समन्वयक हर्षाली गजभिये यांनी वैद्यकीय तपासणी करून घेणे, यंत्रणांशी समन्वय साधणे आदी जबाबदारी स्वीकारली.
महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर यांनी स्वत:कडून १० हजार रुपये प्रवास खर्चासाठी उपलब्ध करून दिले. पद्माकर सदानशिव, सुनील लाडूलकर यांचेही सहकार्य मिळाले. ‘चाईल्डलाईन’च्या अरुणा अंभोरे, रोहित धाक्रे, राजेश मनवर यांनी या महिलेला सराईकेला येथील ‘वन स्टॉप सेंटर’ येथे सर्व कागदपत्रांसह सुपुर्द केले. या महिलेला कुटुंबात किंवा नारी शक्ती केंद्रात पुनर्वसनासाठी पाठविले जाणार आहे. एका हरविलेल्या महिलेला तिच्या मायभूमीत व कुटुंबाजवळ परत पाठविण्याचे अनमोल कार्य संस्थांनी केले.