भंडारा : शेतकऱ्यांच्या मुलांना कुणी लग्नासाठी मुलगी द्यायला तयार होईना. त्यामुळे मुख्यमंत्री साहेब, जमले तर ‘लाडका भाऊ’ योजनासुद्धा आणा, अशी मागणी भंडाऱ्यातील एका शेतकरी पुत्राने केली आहे. अशी योजना काढून मुख्यमंत्र्यांनी शेतकरी पुत्रांना दिलासा द्यावा, अशी त्याची मागणी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भंडाऱ्याच्या एका तरुण शेतकऱ्याने  एक फलक हातात घेतला आणि थेट गावाच्या चौकात उभा ठाकला. या तरुण शेतकऱ्याकडे अवघ्या गावाचे लक्ष लागले होते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे त्याने केलेल्या मागणीमुळे सध्या हा तरुण सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरत आहे.

राज्य सरकारने नुकतीच लाडकी बहीण योजना जाहीर केली. त्यात महिलांना दीड हजार रुपये महिना मानधन देण्यात येणार आहे. याच धर्तीवर शेतकरी पुत्रांसाठी लाडका भाऊ योजना काढावी, अशी या शेतकरी पुत्राची लक्षवेधी मागणी आहे. जयपाल प्रकाश भांडारकर असे पदवीचं शिक्षण घेणाऱ्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. जयपाल याच्याकडे सहा एकर स्वतःची शेती असून त्यात तो भात पिकासह, बागायती शेती करून उत्पन्न घेतो. मात्र,   शेतकरी पुत्रांना विवाहासाठी मुलीही मिळत नसल्याची खंत या युवा शेतकऱ्याने व्यक्त केली आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेल्या अभिनव मागणीची  चांगलीच चर्चा रंगली आहे.

हेही वाचा >>>गोंदिया : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचे ; ‘या’ रेल्वे रद्द, कामकाज प्रभावित…

राज्य सरकारने जाहीर केलेल्या “मुख्यमंत्री लाडकी बहीण” योजनेच्या संदर्भात सोशल मीडियावर अनेक गमतीजमती सांगणाऱ्या मिम्सने (रिल्सने) चांगलाच धुमाकूळ घातला आहे. पुरुषांनी लाडका भाऊ योजनेची सरकारकडे जोरदार मागणी सुरू केली आहे.   शासनाच्या जाचक अटीमुळे या लाडक्या बहिणीलाच आपण सावत्र असल्याचे वाटत असल्याची भावना व्यक्त होत आहे. लाडका भाऊ योजना, लाडकी बायको योजना, “लाडका मेहुणा” योजनेच्याही मागण्या करणाऱ्या गमतीदार मिम्स (रिल्स) मनोरंजक ठरत आहेत. लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यापासून सोशल मीडियावर या योजनेचे सर्वाधिक मिम्स (रिल्स) व्हायरल होऊ लागले आहेत. सोशल मीडियावर सर्वाधिक प्रतिसाद मिळवणारी ही शासकीय योजना सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. एरवी शासकीय योजनांची माहिती सोशल मीडियावर फारशी चर्चेला कधी येत नाही. पण, या योजनेच्या बाबतीत मात्र अगदी उलट  झाले आहे. पुरुष मंडळींकडून महिलांच्या नावाने योजना सुरू होत असल्याने विनोद निर्माण करणारे मिम्स (रिल्स) रोज समोर येत आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The young man direct request to chief minister eknath shinde regarding marriage ksn 82 amy