बुलढाणा : सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येप्रकरणी वाल्मीक कराड, त्याचे साथीदार आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध रान उठविणारे भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले याने लाकडी बॅटने एकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. दरम्यान, या मारहाणीच्या व्हिडिओमधील पीडित युवक बुलढाणा जिल्ह्यातील असून सिंदखेड राजा तालुक्यातील माहेरखेड येथील रहिवासी असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. कैलास वाघ असे पीडित तरुणाचे नाव आहे.
या प्रकरणात बीड जिल्ह्याच्या शिरूर पोलीस ठाण्यात सतीश भोसलेसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. घटनेच्या चौकशीसाठी शिरूर पोलिसांचे पथक शुक्रवारी सायंकाळी माहेरखेडला दाखल झाले. शिरूर पोलिसांच्या पथकाकडून कैलास वाघ याचा जबाब रात्री उशिरापर्यंत नोंदविण्यात आला.
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्याकांड सध्या चर्चेत आहे. अशातच भोसले हा मारहाण करीत असल्याचा व्हिडिओ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पोस्ट करीत भाजपचे आमदार सुरेश धस यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले होते. यामुळे वातावरण चांगलेच तापले.
पीडित जेसीबी ऑपरेटर
पीडित तरुण जेसीबी ऑपरेटर म्हणून काम करीत होता. जेसीबी मालकाचे पैसे थकल्याने त्याच्यावर वसुलीसाठी चोरीचा आळ लावण्यात आला. त्याला दिवाळीच्या आधी माहेरखेड येथून उचलून नेण्यात आले. यानंतर आरोपींनी अमानवीय कृत्य केले, असा उल्लेख असलेला मजकूरदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अमानुष छळ
सतीश भोसले याने कैलास वाघ याला बॅटने मारहाण करण्यापूर्वी गुप्तांगावर पेट्रोल टाकत अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. पीडित कैलास वाघ आणि त्याच्या परिवाराने धक्कादायक माहिती दिली. कैलास वाघ हा बीड जिल्ह्यातील एका गावात पोकलॅण्डवर ऑपरेटर म्हणून काम करत होता. त्याला कामाचे पैसे दिले नाही, म्हणून कैलास वाघ घरी माहेरखेडला निघून आला होता. त्यानंतर बीड जिल्ह्यातील सातजण कैलासच्या घरी आले, त्याच्या कुटुंबीयांना बंदुकीचा धाक दाखवून त्याला बीड जिल्ह्यात घेऊन गेले. तिथे बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर त्याच्या गुप्तांगावर पेट्रोल टाकून दहा दिवस हाल हाल केले, अशी माहिती स्वतः कैलास वाघ याने माध्यमांसोबत बोलताना दिली. त्यानंतर या सर्व लोकांच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेत आपला जीव वाचवल्याचे कैलास वाघ याने सांगितले.