महापालिका आयुक्तांच्या कक्षात एका तरुणाने स्वतःवर चाकूने वार करून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणाला आता वेगळे वळण प्राप्त झाले आहे. एका कामासाठी महापालिका आयुक्त राजेश मोहिते यांना दिलेले १४ लाख ७० हजार रुपये परत मिळत नसल्याने या युवकाने त्यांच्या कक्षात आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. याबाबतची एक ध्वनीफित सध्या समाज माध्यमांवर सार्वत्रिक झाली आहे.
शीना बोरा हत्याकांड : माफीचा साक्षीदार श्यामवर रायला उच्च न्यायालयाकडून जामीन
आयुक्त मोहिते यांनी तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांचे स्वीय सहायक असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर या संस्थेच्यावतीने संचालित आश्रमशाळेच्या कामासाठी १४ लाख ७० हजार रुपये घेतले होते. ती रक्कम मोहिते व त्यांचे तेव्हाचे सहकारी परत देत नव्हते. यातूनच लातूर जिल्ह्यातील टाकळी येथील युवक लक्ष्मण राजेंद्र पवार (३८) याने आयुक्तांच्या कक्षात आत्महत्येचा प्रयत्न केला. याबाबतची एक ध्वनीफित सार्वत्रिक झाल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पवार आयुक्तांच्या कक्षात आत्मदहन करण्याच्या निश्चयाने गेले होते मात्र, त्यांनी स्वत:वर चाकूने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला, असे या ध्वनीफितमधून समोर आले आहे. पोलिसांनी या युवकाला मानसिक रुग्ण ठरवित रुग्णालयात दाखल केले आहे.
या ध्वनीफितमध्ये मोहिते यांच्याशी आर्थिक व्यवहार झाल्याचे व त्यातूनच पवार याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. २०१६-१७ मध्ये राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले असताना मोहिते त्यांचे स्वीय सहायक होते. तसेच अभिमन्यू पवार हे देखील स्वीय सहायक म्हणून कार्यरत होते. औसाचे भाजपचे विद्यमान आमदार सतेज पाटील कळेकर, अभिमन्यू पवार तथा मोहिते यांनी मंत्रालयातून आश्रमशाळेच्या एका कामासाठी लक्ष्मण यांचे वडील राजेंद्र पवार यांच्याकडून १४ लाख ७० हजार रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतरही काम झाले नाही. दरम्यान, याप्रकरणी लातूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतरही पैशासाठी सातत्याने मोहिते यांच्याकडे चकरा मारल्या. मात्र, राजकीय दबाव आणून त्यांनी लातूरमध्ये केलेली तक्रार मागे घेण्यास भाग पाडले. त्यानंतरही बरेच दिवस पैसे मिळावे यासाठी पाठपुरावा केला. मंत्रालयात आत्मदहन करण्याचा आणि उपोषणाचा इशारा दिला. चार ते पाचवेळा चंद्रपुरात येऊन मोहिते यांना पैसे मागितले. मात्र पैसे काही परत मिळाले नाही. चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला. त्यानंतर त्यांनी नागपूरातून ४ लाख रुपये खात्यात टाकले. १० लाख ७० हजार रूपये अजूनही शिल्लक आहे, असे या ध्वनीफितमधून समोर आले आहे.
भंडारा : सुटीचा घोळ; शिक्षणाधिकारी म्हणतात, आदेश कुणाचा?, शाळा व्यवस्थापन म्हणते मुख्यमंत्र्यांचा !
ही ध्वनीफित सार्वत्रिक होताच आयुक्त मोहिते यांनी त्यांच्यात व पवार यांच्यात झालेले तडजोडपत्र माध्यमांना पाठविले. या तडजोड पत्रात मोहिते यांना जो काही मानसिक त्रास झाला त्याबद्दल माफी मागतो, भविष्यात कोणत्याही प्रकारे मोहिते यांना त्रास होणार नाही याची खात्री देतो, असे म्हटले आहे. हे तडजोड पत्र २ मे २०२२ चे आहे. दरम्यान, या प्रकरणात माजी मंत्री, स्वीय सहायक, विद्यमान आमदार अशी सर्वांची नावे समोर येत असल्याने पोलिसांनी लक्ष्मण पवार यांना मानसिक रुग्ण ठरविण्यापेक्षा या प्रकरणाच्या तळाशी जावून सत्य शोधून काढावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.