नागपूर : विनातिकीट रेल्वेगाडीतून प्रवास करीत असलेल्या एका युवकाने तिकीट तपासणीस (टीटीई) आपल्याला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देईल, या भीतीने धावत्या गाडीतून उडी घेतली. त्यामुळे तो जखमी झाला असून त्याच्यावर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) उपचार सुरू आहे. ही घटना महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये कामठीजवळ मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास घडली.
या घटनेते जखमी युवकाचे नाव मोहित संतोष सोनी (२२) आहे. तो मूळचा मध्य प्रदेशातील रिवा येथील आहे. तो राज्यसेवा लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करीत आहे. त्याचे आई-वडील रोजगारासाठी महाराष्ट्रात आले असून ते वाडी, खडगाव रोड येथे राहत आहेत. दिवाळी सणासाठी हे कुटुंबीय मूळगावी रिवा येथे गेले होते.
हेही वाचा – नागपूर : विमान धावपट्टीऐवजी चक्क ‘टॅक्सी वे’वर उतरले!
हेही वाचा – यूजीसी नेट परीक्षा ६ डिसेंबरपासून, ‘एनटीए’कडून वेळापत्रक जाहीर
आई-वडिलांसोबत मोहित नागपूरला येत होता. परतीच्या प्रवासात त्यांनी रिवा ते इतवारी एक्सप्रेसने भंडारा गाठले. तेथून ते महाराष्ट्र एक्सप्रेसने नागपूर स्थानकावर येणार होते. गाडी कन्हान-कामठी दरम्यान असताना तिकीट तपासणीस (टीटीई) आले आणि त्यांनी मोहितच्या वडिलांकडे तिकीटबाबत विचारणा केली. तिकीट नसल्याने मोहित घाबरला. टीटीई आपल्याला रेल्वे पोलिसाच्या ताब्यात देईल या भीतीने त्याने धावत्या गाडीतून उडी घेतली. हे दृश्य बघून गाडीतील प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. मात्र, कोणीही साखळी खेचून गाडी थांबवली नाही. कामठी येथे गाडी थांबल्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाने त्या युवकाकडे धाव घेतली. त्याला कामठी आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. दुखापत गंभीर असल्यामुळे त्याला नागपुरातील मेयो रुग्णालयात हलवण्यात आले.