अनिल कांबळे, लोकसत्ता
नागपूर: शहरातील युवावर्ग गजबजलेल्या भागातील मोठ्या झगमगाटात सुरू असलेल्या हुक्का पार्लरच्या वाटेवर आहे. मध्यरात्रीच्या सुमारास तरुण-तरुणींचे घोळके हुक्का पार्लरमध्ये धूर उडवत आनंद घेत असल्याचे चित्र पहायला मिळते. मात्र, हा सर्व प्रकार ठाणेदारांच्या ‘अर्थपूर्ण’ संबंधामुळे सुरू असल्याची चर्चा आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारताच ‘ड्रग्स फ्री सीटी’ मोहीम हाती घेत शहरातील अंमली पदार्थांची तस्करी व विक्री आणि हुक्का पार्लर सर्व बंद केले होते. पोलीस आयुक्तांच्या आक्रमक पवित्र्यामुळे जवळपास वर्षभर शहरातील सर्वच हुक्का पार्लर बंद होते. मात्र, सध्या पोलीस आयुक्तांची नजर अन्य मोहिमांकडे वळताच ठाणेदारांनी तपास पथकातील (डीबी) वसुलीबहाद्दर कर्मचाऱ्यांना सक्रिय केले.
हेही वाचा… चक्क सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या घरी चोरीचा प्रयत्न
सध्या शहरातील अनेक भागात हुक्का पार्लर मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहेत. सर्व हुक्का पार्लर मालकांशी ठाणेदारांनी आणि गुन्हे शाखेच्या पथक प्रमुखांनी ‘अर्थपूर्ण’ संबंधाची बोलणी केल्याची माहिती आहे. शहरात रामदासपेठ, सदर, धरमपेठ, अंबाझरी, बजाजनगर, सीताबर्डी, गिट्टीखदान, धंतोली, बेलतरोडी, कोतवाली, लकडगंज, नंदनवन, प्रतापनगर, एमआयडीसी, जरीपटका आणि सक्करदरा परिसरातील हुक्का पार्लरमध्ये उच्चभ्रू तरुण-तरुणी व बाहेरून शिकायला आलेल्या विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. हुक्क्यासह अंमली पदार्थही उपलब्ध केले जात असल्यामुळे तरुण-तरुणी व्यसनाधीन होत आहे. अनेक हुक्का पार्लरच्या संचालकांशी पोलीस मित्र कुणाल-मोनू या जोडीचे संबंध आहेत. त्यामुळे छापा पडण्यापूर्वीच त्यांना माहिती मिळत असल्याची चर्चा आहे.
कायदा व सुव्यवस्था धोक्यात
अंबाझरी, सदर आणि सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हुक्का पार्लरमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीचे युवक येतात. तीन दिवसांपूर्वीच गोकुळपेठेतील प्रीतम यादवच्या हुक्का पार्लरमध्ये सलमान सुफी आणि आठ मित्रांनी गोंधळ घातला. प्रीतमचा मित्र सागर यादव याने चक्क पिस्तूल दाखवून दशहत निर्माण केली. या घटनेची चित्रफीतही समाजमाध्यमावर प्रसारित झाल्याने गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे पार्लरमुळे कायदा व सुव्यवस्थाही धोक्यात आली आहे. तर सदरमधील हुक्का पार्लरमध्ये एका तरुणीशी अश्लील वर्तन केल्याची घटना घडली होती.
शहरातील हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेकडून वेळोवेळी छापे घातले जातात. ‘ड्रग्स फ्री सीटी’ अभियानाअंतर्गत कारवाई सुरू आहे. चोरून-लपून हुक्का पार्लर सुरू असतील तर कारवाई करण्यात येईल. – मुमक्का सुदर्शन, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा.