माजी आमदार चैनसुख संचेती व बुलडाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक यांच्या अपहरणाचा डाव उधळण्यात आला आहे. सध्या बुलढाणा पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तिघा संशयितांकडून ही धक्कादायक माहिती सामोर आली आहे. बेरोजगारी व तुटपुंज्या कमाईला कंटाळून झटपट श्रीमंत होण्याच्या नादात हे युवक दिल्लीत गेले नि अडकले. ‘ त्या’ तिघांना दिल्ली पोलिसांनी पकडले. ते मूळचे बुलढाण्याचे निघाल्याने त्यांना बुलढाणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
हेही वाचा >>> नवी मुंबई : प्रवासी असल्याचा बहाणा करून आरोपीने वाहन चालकाला लुटले
बुलढाणा शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रल्हाद काटकर यांनी या युवकांचा अपहरणाचा डाव असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. संशयित युवकांना दिल्ली आयबी ने १३ सप्टेंबरला बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात दिले. गुन्हे शाखेने त्यांची कसून चौकशी केली.
अजमेरमधून बंदूक घेतली
या युवकांनी अजमेर येथून बंदूक विकत घेतली. एखाद्या बँकेत दरोडा घालायचा, नंतर लुटीतून कार व कार्यालय घ्यायचे आणि नंतर बड्या उद्योगपतींचे अपहरण करून गडगंज पैसा कमवायचा अशी त्यांची योजना होती. मात्र त्याआधीच दिल्ली आयबीने त्यांच्या मुसक्या आवळल्या. हे संशयित भविष्यात मोठे गुन्हेगार होऊ शकतात म्हणून त्यांच्यावर नजर ठेवून कठोर कारवाई करावी अशा सूचना आयबीने केल्या आहेत.
माझे कुणाशी शत्रुत्व नाही – चांडक
याबाबत राधेश्याम चांडक म्हणाले, माझे कुणाशी शत्रुत्व नाही. त्यामुळे माझ्या अपहरणाचा प्रश्नच येत नाही. काही तासांपूर्वी मला ही माहिती मिळाली. अजून पूर्ण माहिती माझ्याकडे नाही. ते तिघे बुलढाण्यातील असून आता पुढील तपासात बाकी काय ते कळेलच.