वाशीम येथील पोलीस ठाण्यासमोरील डाकघरात चोरी करून चोरट्यांनी थेट पोलिसांनाच आव्हान दिले आहे. बुधवारी रात्री चोरट्यांनी डाकघरात चोरी केली. ही घटना आज, बुधवारी सकाळी कर्मचारी कार्यालयात दाखल झाले तेव्हा उघडकीस आली. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून जनमानसातून पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
हेही वाचा >>>नागपूर : दोनपेक्षा अधिक श्वान पाळण्यावर कारवाईचे धोरण थंडबस्त्यात, शहरात भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढला
कारंजा, मंगरूळ पीर, मानोरा येथे दिवाळीच्या दिवसात चोरीच्या घटना उघडकीस आल्या होत्या, तर वाशीम तालुक्यात गेल्या आठवड्यात वीसच्यावर चोरीच्या घटना घडल्या. पोलीस विभागाकडून रात्रीची गस्त सुरू असतानादेखील चोरीच्या घटना वाढत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. पोलिसांची जरब नसल्याने शहरात कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. यामुळेच की काय, चोरट्यांनी थेट पोलीस ठाण्यासमोरील डाकघरात चोरीचा प्रयत्न केला. मात्र ‘लॉकर’ तोडता न आल्याने त्याचा प्रयत्न फसला. पोलिसांसमोर आता चोरट्यांना पकडण्याचे आव्हान आहे.