बुलढाणा: अपघात, डिझेल चोरीने चर्चेत असणाऱ्या समृद्धी महामार्गावर नुकतेच झालेल्या जबरी चोरीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. या कारवाईत तीन सदस्यीय टोळीला अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ६ लाख ६३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मागील २४ ऑगस्ट २०२३ रोजी जालना जिल्ह्यातील बाबुराव फुके( उमरखेड ता. भोकरदन) हे आपल्या वाहनाने संभाजीनगरकडे जात होते. दरम्यान त्यांचा पाठलाग करणाऱ्या टोळीने स्विफ्ट डिझायर वाहन आडवे टाकून त्यांना अडविले. यावेळी त्यांनी जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्या जवळील १लाख २०हजार रुपये मोबाईल हिसकावून पळ काढला. मेहकर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
हेही वाचा >>> अपघात प्रवणस्थळी लोकसहभागातून मदत केंद्र, नागपुरातील उपक्रमाची काय आहे वैशिष्ट्ये?
दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक सुनिल कडासने यांनी तपास स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अशोक लांडे यांच्याकडे सोपविला. त्यांनी विविध पथके नेमली. प्राप्त गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे पथकांनी गजानन जाधव ( २२, रा. भिवपूर, ता. भोकरदन जि. जालना) व अनिल पवार ( तिसगाव, जि. संभाजीनगर) यांना अटक केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार राजेश गवळी ( ३६, मुकुंदवाडी, संभाजीनगर) याला अटक केली. त्यांच्या जवळून स्विफ्ट डिझायर वाहन, १२ मोबाईल, नगदी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.