आमदार रवी राणा यांच्या भानखेडा ते मोगरा मार्गावरील शेतातील गोदामातून ५ लाख ५८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. ही घटना रविवारी उघडकीस आली. या प्रकरणी बडनेरा ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीवरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा >>> भंडारा : ‘क्रिप्टो करन्सी’च्या नावाखाली अडीच लाखांची फसवणूक
आमदार रवी राणा यांचे भानखेडा ते मोगरा मार्गावरील शेतात दोन गोदामे आहेत. सुशील गजानन ठाकूर (५४) रा. संभाजीनगर हे या गोदामांची देखरेख करतात. या गोदामात आमदार रवी राणा यांच्यातर्फे गरीब व गरजूंना वाटण्यात येणारे किराणा साहित्य ठेवण्यात आले होते. १९ ऑगस्ट रोजी सुशील ठाकूर हे गोदामातून साखरेचे दोन पोते घेऊन अमरावतीत आल्यावर त्यांना तेथे सर्व साहित्य व्यवस्थित असल्याचे दिसून आले होते. परंतु, ४ सप्टेंबर रोजी गोदामात गेल्यावर त्यांना दरवाजावरील जाळी तुटलेली दिसून आली. तसेच तेथील सर्व साहित्य अस्तव्यस्त स्थितीत आढळून आले. चोरट्यांनी गोदामातील किराणा साहित्यासह साउंड सिस्टीमचे एप्लिफायर, युनिट चोरी केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे सुशील ठाकूर यांनी या घटनेची माहिती तत्काळ मोबाइलवरून नितीन मस्के यांना दिली. त्यानंतर त्यांनी आमदार रवी राणा यांना फोन करून गोदामात चोरी झाल्याच्या घटनेची माहिती दिली. या प्रकरणी सुशील ठाकूर यांनी बडनेरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलीस उपायुक्त एम. एम. मकानदार, बडनेराचे ठाणेदार बाबाराव अवचार यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू आहे.