नागपूर : ‘सी-२०’ परिषदेच्या निमित्ताने १४० कोटी रुपये खर्च करून शहराचे सौंदर्यीकरण करण्यात आले. पण, परिषद आटोपल्यावर चोरट्यांनी ठिकठिकाणी लावलेल्या जाळ्या (नेट), सुशोभित झाडे पळवण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे नागपूरकरांना शहर सौंदर्यीकरणाचे वावडे आहे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

‘सी-२०’ परिषदेच्या निमित्ताने शहराचे रुपडे पालटण्यात आले. शहराचे हे सौंदर्य कायम राहावे, अशीच सर्वांची इच्छा होती. मात्र परिषद आटोपल्यावर महापालिकेचे त्याकडे दुर्लक्ष झाले आणि चोरट्यांनी विविध वस्तू पळवण्याचा सपाटा सुरू केला. परिषदेपूर्वी झाड चोरणाऱ्याला पोलिसांनी पकडले होते. पण परिषद आटोपल्यावर पुन्हा हा प्रकार सुरू झाला आहे. मॉरिस कॉलेज टी-पॉईंट ते विद्यापीठ चौकादरम्यान रस्त्यालगतच्या नाल्यावर लावलेल्या ग्रीन मॅट पळवण्यात आल्या आहेत. वर्धा मार्गावर लावण्यात आलेली फुलझाडांची अवस्थाही तशीच आहे. कुंड्या दुर्लक्षित झाल्याने झाडांनीही माना टाकल्या आहेत. त्याचा फायदा घेत रात्रीच्या वेळी कुंड्या पळविल्या जात आहेत.

वन्यप्राण्यांच्या प्रतिकृतींचीही दुरवस्था

वर्धा मार्गावर मेट्रोच्या पुलाखाली लावण्यात आलेल्या वन्यप्राण्यांच्या प्रतिकृतींचीही दुरवस्था होऊ लागली आहे. अनेकजण दुभाजकावरील हिरवळीवर झोपताना दिसून येतात. तेथील फुल झाडांच्या कुंड्याही गायब झाल्या आहेत.

हेही वाचा – अमरावती : चक्‍क मॉलमधून ‘आयपीएल’वर सट्टेबाजी

परिषदेपूर्वी झाडे चोरीची घटना उघडकीस आल्यावर त्याची तात्काळ दखल पोलीस व महापालिका प्रशासनाने घेतली होती. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनीही नागपूरकरांना आवाहन करीत शहर सौंदर्यीकरणात नागपूरकरांचेही योगदान महत्त्वाचे आहे, असे सांगितले होते.

सी-२० च्यानिमित्ताने करण्यात आलेल्या सौंदर्यीकरणामुळे शहराचा चेहोरामोहराच बदलला होता. तो कायम ठेवण्याची जबाबदारी जेवढी महापालिका व किंवा तत्सम यंत्रणांची आहे तेवढीच सर्वसामान्य नागपूरकरांचीसुद्धा आहे, ही बाब प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवी, असे मत निवृत्त अधिकारी अनिल देशमुख यांनी व्यक्त केले.

हेही वाचा – संघ शिक्षा वर्गात स्वयंसेवकांमध्ये संस्कारांचे बीजारोपण – रामदत्त

रस्त्यावरून दिसणारे नाले झाकण्यासाठी तेथे सेल्फी पॉईंट तयार करण्यात आले होते. त्यासाठी लावलेल्या जाळ्या चोरून नेणे हा फारच वाईट प्रकार आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

नागपूर सिटीझन्स फोरमने ‘सुधरा रे नागपूरकर’ अशी मोहीम यापूर्वी हाती घेतली होती. नागरिकांचा सहभाग आहे म्हणून इंदोर हे देशातील स्वच्छ शहर म्हणून ओळखले जाते. आपल्याकडेही सी-२० च्या निमित्ताने शहर सौंदर्यीकरण झाले. ते टिकवून ठेवण्याची जबाबदारी नागरिकांची आहे. आपण आपले घर जसे स्वच्छ ठेवतो. त्याचप्रमाणे शहरसुद्धा आपले घरच आहे”. – अभिजित चंदेल, सिटीझन्स फोरम.

Story img Loader