“विदर्भातील शेतकऱ्यांनी दर्जेदार निर्यातक्षम कृषी उत्पादन घेण्याची गरज आहे. कृषी उत्पादनाच्या निर्यातीतून शेतकरी समृद्ध होऊ शकतो. सक्षम निर्यात आणि कृषी क्षेत्रात व्यापक रोजगार निर्मितीतून विदर्भ शेतकरी आत्महत्यामुक्त होऊ शकतो.”, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज(गुरुवार) येथे व्यक्त केले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ३६ व्या दीक्षांत समारंभात प्रमुख अतिथी म्हणून दीक्षांत भाषण करताना ते बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, विशेष अतिथी म्हणून माजी कुलगुरू पद्मश्री मोतीलाल मदन उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर कुलगुरू डॉ. विलास भाले, कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे यांच्यासह कार्यकारी परिषदेचे सदस्य आदी उपस्थित होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ या मानद आचार्य पदवीने सन्मानित करण्यात आले.
विकास दरात कृषी क्षेत्राचा वाटा केवळ १२ टक्के राहिला –
गडकरी म्हणाले, “विदर्भातील कृषी क्षेत्र जाणून घेत विद्यार्थ्यांनी संशोधन व अभ्यास करावा. स्वातंत्र्यानंतर परिस्थितीत व्यापक प्रमाणात बदल झाले आहेत. विकास दरात कृषी क्षेत्राचा वाटा केवळ १२ टक्के राहिला. त्यामध्ये वाढ करण्याची नितांत आवश्यकता आहे. उत्तम दर्जाचे वृक्ष, रोप आपल्याला इतर ठिकाणावरून आयात करावे लागतात. इस्त्राईलसह इतर देशांमध्ये प्रगत संशोधन आहे. भारतात ते का होऊ शकत नाही? याचे आत्मचिंतन करा.”, असा सल्ला त्यांनी दिला.
तर, अध्यक्षीय भाषणात डॉ. भगतसिंग कोश्यारी यांनी रासायनिक शेतीऐवजी नैसर्गिक शेतीवर भर देण्याचे आवाहन केले. कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी अहवाल वाचन केले. समारंभात ३६४६ विद्यार्थ्यांना विविध पदव्या प्रदान करण्यात आल्या, तर ३१ जणांना आचार्य पदवीने सन्मानित करण्यात आले.