विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवशी विधान परिषदेत सुषमा अंधारेंवर हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्याच्या मागणीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाली. दरम्यान, सुषमा अंधारेंनी येत्या आठ दिवसांत दिलगिरी पत्र दिले नाही तर त्यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्याची परवानगी देऊ, असा इशारा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी सुषमा अंधारे यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्याची मागणी केली. विधानसभेचे आमदार रवींद्र धंगेकर यांना सभागृहात बोलण्याची संधी नीलम गोऱ्हे देत नसल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी माध्यमांसमोर केला होता. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सभागृहानेही याची दखल घेतली. रवींद्र धंगेकर हे विधानसभेचे सदस्य असताना त्यांना नीलम गोऱ्हे बोलण्याची कशी काय परवानगी देऊ शकतात? असा सवाल प्रवीण दरेकर आणि सुधीर मुनगंटीवार यांनी विचारला. याप्रकरणी उपसभापतींची बदनामी केल्याप्रकरणी सुषमा अंधारेंवर हक्कभंग दाखल करण्याची मागणी प्रवीण दरेकर यांनी केली.

प्रवीण दरेकर यांच्या या मागणीवर उत्तर देताना उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या, रवींद्र धंगेकरांना बोलण्यास नीलम गोऱ्हे संधी देत नाहीत, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला होता. मला वाटलं की रवींद्र धंगेकर यांना सुषमा अंधारेंच्या चुकीच्या वक्तव्याची जाणीव होईल आणि ते त्यांना समजावतील. त्यामुळे मी पाच ते सहा दिवस त्यांची वाट पाहिली. उद्धव ठाकरेही सभागृहात येत असतात. आपले प्रवक्ते इतकं चुकीचं बोलले आहेत यावरून ते समज देतील. पण त्यांना त्यांच्या चुकीच्या वक्तव्याची जाणीव कोणीच करून दिली नाही. त्या ज्ञानी आहेत. हे स्वतःला ज्ञानी समजतात. त्यांना सर्व समाज सर्टिफिकेट देतो की ते ज्ञानी आहेत. मग त्यांना दिलगिरी व्यक्त करण्याचं सौजन्य असू नये? असा सवाल नीलम गोऱ्हे यांनी विचारला.

“एकच खोटं तीन तीन वेळा सांगितलं की ते खरं वाटायला लागतं. सुषमा अंधारेंची ही सूचक असल्याचं सचिन अहिरांनी मान्य केलंय. पण सुषमा अंधारेंनी आता तसं लेखी पत्र दिलं पाहिजे. अज्ञानातून किंवा गैरसमाजतून त्यांनी तसं वक्तव्य केलं असं त्यांनी मान्य केलं पाहिजे. आठ दिवसांत त्यांच्याकडून तसं पत्र आलं नाही तर प्रवीण दरेकरांना त्यांच्यावर हक्काभंगाचा प्रस्ताव दाखल करण्याची परवानगी देणार आहे”, असंही नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Then we will file a violation of rights against sushma andhare warned legislative council deputy speaker neelam gorhe sgk