बुलढाणा : दुष्काळसदृश्य परिस्थिती असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागात रोजगाराची वानवा असताना तब्बल ५६१ ग्रामपंचायतीमध्ये रोहयो ची कामेच सुरू नाहीये! यामुळे कामाच्या शोधात असलेल्या हजारो मजुरांची दैना होत असल्याचे दुर्देवी चित्र आहे.पावसाच्या लहरीपणामुळे खरीप हंगाम उध्वस्त झाला. सोयाबिन, कपाशी या मुख्य पिकासह सर्व पिकांच्या एकरी उत्पादनात ४० टक्के घट आली. त्यातच हाती आलेल्या पिकांना मातिमोल भाव मिळत आहे. रब्बी पिकांनाही अवकाळी पावसाचा तडाखा  मिळाला. यामुळे शेतीत कामे नसल्याने रोहयो ची कामे हाच मजुरांचा आधार आहे. मात्र जिल्ह्यातील ८८९ पैकी ५६१ ग्रामपंचायत क्षेत्रात मनरेगा ची कामेच सुरू नसल्याने मजुरांची स्थिती बिकट झाली.

शेगाव तालुक्यातील ४६पैकी ५,  नांदुरा मधील ६५ पैकी १५, चिखली ९९ पैकी ३४, सिंदखेड राजा ८९ पैकी २८ ग्रामपंचायत मध्येच कामे सुरू आहे.  अशीच बिकट स्थिती इतर तालुक्यातील आहे.गावागावातील युवा वर्ग पोटाची खळगी भरण्यासाठी महानगरात स्थलांतरित झाला आहे. मात्र उर्वरित ग्रामीण मजुरांना रोजगारच नसल्याचे चित्र आहे.

हेही वाचा >>>‘धर्मसंसद व हिंदू धर्मगुरूद्वारे अंधश्रद्धा वाढवण्याचे काम’, प्रा.मानव म्हणतात, मृतदेहांच्या सोपानावर भाजप…

आठ हजारांवर मजूर

सध्या ३२८ ग्रामपंचायत मध्ये कामे सुरू आहे.  यात वृक्ष लागवड, घरकुल, सिंचन विहीर, पांदण रस्ते,  गुरांचे गोठे आदि कामाचा समावेश आहे. या कामावर तब्बल ८२१७ मजूर आहेत. फेब्रुवारीच्या मध्यावरच असलेली ही लक्षणीय संख्या लक्षात घेतली,  तर मजुरांना रोजगाराची सक्त आवश्यकता असल्याचे स्पष्ट होते. एरवी एप्रिल मध्ये इतकी मजुरांची उपस्थिती राहते.

Story img Loader