नागपूर : पक्ष चालवताना सर्वांना सोबत घेऊन काम करावेच लागते. आमचीही तशीच तयारी आहे. पण, पक्षहिताला कुणी बाधा पोहचवत असेल तर नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन यांच्या निर्देशानुसार कठोर पावले उचलली जातील. त्यातंर्गत प्रदेश काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल लवकरच दिसून येतील, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
सिव्हिल लाईन्समधील राणी कोठी येथे प्रदेश काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक मंगळवारी पार पडली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पक्षातील काही प्रमुख पदाधिकारी यांच्यातील रुसवे-फुसगे आणि बैठकीला काहींची गैरहजेरी अशा स्थितीत पक्ष आगामी निवडणूक भक्कमपणे कसा लढू शकेल, अशी विचारणा केला असता ते म्हणाले, पक्षामध्ये या गोष्टी चालत असतात. गैरहजर असण्याची वैयक्तिक काही कारणे असू शकतात. पण, विनापरवानगी बैठकीला अनुपस्थित राहणाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल.
हेही वाचा >>> “काँग्रेसकडे एकनाथ शिंदेंपेक्षा ताकदीचे नेते, फक्त…”, नाना पटोलेंचा खोचक टोला
समाधानकारक उत्तर न मिळाल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई देखील करण्यात येईल. त्यामुळे लकवरच पक्षात मोठे बदल दिसून येतील, असेही ते म्हणाले. काँग्रेसच्या स्थापना दिनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी पुण्याच्या कार्यालयाला दिलेल्या भेटीचा संदर्भ देत पटोले म्हणाले, लोकांना काँग्रेस हवी आहे. ते काँग्रेसची वाट पाहत आहेत. आता काँग्रेस नेत्यांनी त्यांच्यापर्यंत पोहचण्याची आवश्यकता आहे. हाथ से हाथ जोडो अभियानातून हीच गोष्ट केली जाणार आहे.
हेही वाचा >>> काँग्रेसचे आता, ‘चलो श्रीनगर’! प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत घोषणा
या बैठकीला माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, सुनील केदार, विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, तेलंगणाचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, नागपूर ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष माजी मंत्री राजेंद्र मुळक यांच्यासह काँग्रेस नेते उपधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा >>> राज्यपालांकडून पुन्हा वादाला तोंड; नागपूर विद्यापीठात केलेल्या नियुक्त्यावरून वाद
मोदींनी ब्राझीलपेक्षा भारताच्या लोकशाहीवर बोलावे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्राझीलमध्ये लोकशाही नसल्याची टीका केली आहे. त्यावर कटाक्ष करताना नाना पटोले म्हणाले, मोदी सरकारने देशातील नोकरशहा, न्यायपालिका आणि निवडणूक आयोगासारख्या संविधानिक संस्थांना खिळखिळे केले आहे. परिणामी, भारतीय लोकशाहीच धोक्यात आहे. त्यामुळे मोदींनी आधी भारताच्या लोकशाहीबद्दल बोलावे, असेही पटोले म्हणाले.
पांडे यांना श्रद्धांजली
भारत जोडो यात्रेत हृदयविकाराने निधन झालेले सेवादलाचे ज्येष्ठ नेते कृष्णकुमार पांडे यांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. नागपूरचे पांडे हे राहुल गांधी यांच्या यात्रेत सहभागी झाले होते. यात्रेदरम्यान त्यांच्या मृत्यू झाला होता.