लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या निकषात न बसणाऱ्यांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे निकषात न बसणाऱ्या ‘बहिणीं’नी योजनेतून नाव कमी करण्यासाठी स्वत:हून पुढाकार घ्यावा आणि महिला बाल कल्याण विभागाच्या लेखाशीर्षावर पैसे भरावेत, अशी सूचना महिला व बालकल्याण विभागाचे सचिव अनुपकुमार यांनी केली आहे. त्यामुळे योजनेतील लाभार्थ्यांना कात्री लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर आता ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ही बंद होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना धक्का बसणार आहे.

युवा वर्गाचे शिक्षण पूर्ण झाल्यांनतर वेळेत योग्य मार्गदर्शन आणि व्यवसाय करणाऱ्यांसाठी भांडवल उपलब्धता शासन विविध योजनांच्या माध्यमातून करून देत आहे. रोजगार इच्छुक युवक-युवती आणि रोजगार देणाऱ्या विविध आस्थापना यांच्यामध्ये संवाद आणि समन्वय साधून उद्योग क्षेत्राला आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ आणि युवा वर्गाला रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ सुरू केली होती. या योजनेत बारावी उत्तीर्ण, आय.टी.आय., पदविका, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या युवकांना प्रशिक्षणाअंती अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याबरोबरच विद्यावेतन देखील देण्यात आले. विधानसभा निवडणुकीच्या आधी सुरू झालेल्या या योजनेला आता सहा महिने झाले असून प्रशिक्षण बंद होणार आहे.

आणखी वाचा-सैफवरील हल्ला राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारा; नाना पटोले यांची टीका

मुख्यमंत्र्यांकडे माजी आमदाराने केली मागणी

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण प्रशिक्षणार्थी म्हणून शासकीय विभागांमध्ये नियुक्ती देण्यात आलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना दरमहा १० हजार रुपये मानधन सुरू झाले होते. मात्र, सहा महिन्यांचा कालावधी संपण्याच्या मार्गावर आला आहे. त्यामुळे लाडक्या भावांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण प्रशिक्षणार्थी यांचा कालावधी वाढवा, अशी मागणी माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे.

आणखी वाचा-विकासात राज्याचा पहिला जिल्हा होऊ पाहणाऱ्या गडचिरोलीत वाळू तस्करांच्या हप्त्यांमुळे…

महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत बेरोजगार युवकाना प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली होती. त्याअंतर्गत विविध शासकीय विभागात रुजू आहेत. त्यामध्ये आपले कर्तव्य व जबाबदारी अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्तम प्रकारे पार पाडत आहेत. युवा प्रशिक्षणार्थी म्हणून हा कालावधी फक्त सहा महिने आहे. हा कालावधी फेब्रुवारी २०२५ मध्ये समाप्त होणार आहे. त्यानंतर सर्व प्रशिक्षणार्थी पुन्हा बेरोजगार होणार आहे. महाराष्ट्रातील विविध विभागातील हजारो पदे रिक्त असताना प्रत्येक कार्यालयामध्ये असणाऱ्या युवकांनी चांगल्या प्रकारे कामकाज केलेले आहे. त्यांना नियमित करण्यात यावे, अशी मागणी भूयार यांनी केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There are signs that chief ministers youth work training scheme is also going to be closed dag 87 mrj