नागपूर : राज्य शासन वर्ग २, ३ व वर्ग ४ च्या १८६ संवर्गातील सर्व पदे शासन कंत्राटी पद्धतीने भरणार आहे. या निर्णयाचा तीव्र विरोध राज्यातील युवा वर्ग करत आहे. कंत्राटी भरतीचा शासन निर्णय फाडून महायुती सरकारचा निषेध राज्यातील अनेक भागांत होत आहे. अशातच आता कंत्राटी भरतीवरून अनेक मिम्स समोर यायला लागले आहे. त्यात समाज माध्यमांवर एक मिम्स धुकाकूळ घालत आहे.
करोनाच्या काळात अनेक खासगी क्षेत्रातील लोकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळे शासकीय सेवेतील नोकरीच हवी असा एक समजही पुढे आला. आता शासनाने कंत्राटी भरतीचा धडाका लावला आहे. त्यामुळे ‘‘मुलींनाे कंत्राटी भरतीच्या विरोधात सर्वाधिक संख्येने तुम्ही रस्त्यावर उतरा, अन्यथा तुम्हाला सरकारी नवरा कसा मिळेल’’, असा संदेश समाज माध्यमांवर फिरत आहे.
हेही वाचा – धक्कादायक.. नागपुरातील मेडिकल-मेयो रुग्णालयात २४ तासांत २५ रुग्णांचा मृत्यू
हेही वाचा – भंडाऱ्यात भर वस्तीत देहविक्री व्यवसाय
शासनाने सेवापुरवठादार संस्थांची निवड करून त्यांच्या माध्यमातून बाह्ययंत्रणेच्या (आऊटसोर्सिंग) माध्यमातून मनुष्यबळ घेण्याचा निर्णय घेतला. राज्यभरातून या निर्णयाचा विरोध होत असून निर्णय मागे घेत नियमित पदभरतीची मागणी केली जात आहे. मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, वर्धा अशा सर्वच शहरांमध्ये आंदोलने सुरू आहेत. यानंतरही शासनाने दोन दिवसांआधी इतर मागास बहुजन कल्याण विभागातील ८२१ जागांवर कंत्राटी भरतीचा निर्णय जाहीर केला. आता वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागात तब्बल ५ हजार ५६ पदे भरली जाणार आहेत.