नागपूर : प्रादेशिक समोतल आणि जातीय समीकरण साधण्याची काँग्रेसची परंपरा लक्षात घेता विजय वडेट्टीवार यांची विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी निवड तशी धक्कादायक नाही. परंतु, वडेट्टीवारांची ही ‘पदोन्नती’ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासाठी मात्र धोक्याचा इशारा मानला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील फुटीने राज्यातील राजकीय घडामोडीने वेग घेतला आहे. काँग्रेसकडे विरोधी पक्षनेतेपद आले आणि त्यासाठी विजय वडेट्टीवार यांना संधी मिळाली. पण, राज्यातील जातीय राजकारण बघता वडेट्टीवार यांना एवढ्या सहज हे पद मिळालेले दिसत नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला राज्यात वाव आहे. त्यावर नजर ठेवून काँग्रेसने ही निवड केल्याचे कळते. उत्तर महाराष्ट्रातील नेते बाळासाहेब थोरात हे विधानसभेतील गटनेते आहेत. विधान परिषदेत पश्चिम महाराष्ट्रातील सतेज पाटील यांना संधी मिळाली आहे. प्रदेशाध्यक्षपद नाना पटोले यांच्या रूपाने विदर्भाला देण्यात आले आहे. मराठवाड्याकडे सध्यातरी पक्ष संघटनेत किंवा विधानसभेत एकही मोठे पद नाही. विदर्भाला मात्र प्रदेशाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेतेपद मिळाले आहे. नेमकी हीच बाब पटोले यांच्यासाठी धोक्याची घंटा असल्याचे त्यांच्या पक्षातीलच विरोधक सांगत आहेत.

हेही वाचा – गोंदिया भाजी बाजारात टोमॅटो २०० रुपये किलो, सर्वसामान्यांचे हाल

पटोले यांच्या कार्यशैलीवर पक्षातील जुने नेते नाराज असल्याची चर्चा आहे. माजी मंत्री सुनील केदार, विजय वडेट्टीवार यांनी तर दिल्लीत जाऊन पटोले यांची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली होती. वडेट्टीवार यांनी उघडपणे पटोले यांच्यावर टीका केली होती. हा अलिकडचा अनुभव ताजा असतानाही वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याने पटोलेंच्या भविष्याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसला पक्ष संघटनेते प्रादेशिक समतोल साधावा लागणार आहे. तसेच जातीय समीकरणदेखील बघावे लागणार आहे. ही बाब लक्षात घेता मराठवाड्याकडे प्रदेशाध्यक्षपद जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पटोले आणि वडेट्टीवार हे दोन्ही नेते विदर्भातील आहेत. तसेच दोन्ही नेते ओबीसी आहेत. सध्या ओबीसींचे राजकारण जोरात आहे. त्यामुळे एकतरी ओबीसी नेता महत्त्वाच्या पदावर ठेवणे आवश्यक होते. तसेच घडले आहे. परंतु, आता प्रदेशाध्यक्ष पद मराठवाड्याकडे जाऊ शकते, अशी चर्चा आहे.

माझ्या उपस्थितीतच निर्णय

मी दोन दिवस दिल्लीत होताे. माझ्या उपस्थितीतच विरोधी पक्षनेत्याचे नाव अंतिम झाले. विदर्भ कायम काँग्रेसच्या बाजूने राहिला आहे. त्यामुळे विदर्भात दोन महत्त्वाचे पद राहणे शक्य आहे. – नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस.

हेही वाचा – “पवार-मोदींच्या भेटीने आघाडीवर परिणाम नाही”, विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांचा दावा; म्हणाले…

पटोले, पक्षश्रेष्ठींचे आभार

पक्षश्रेष्ठी आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मला विरोधी पक्षनेतेपदी योग्य समजल्याबद्दल आभार. या जबाबदारीच्या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करेल. – विजय वडेट्टीवार, विधानसभा विरोधीपक्ष नेते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There is a talk that the post of the state president of congress will go to marathwada ssb 93 rbt