वर्धा : येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ म्हणजे वादविवाद, भांडणे, गैरप्रकार व सावळागोंधळ यांचे जणू व्यासपीठ ठरते की काय, अशी चर्चा होत असते. कुलगुरू विरुद्ध प्राध्यापक विरुद्ध प्रशासन विरुद्ध विद्यार्थी विरुद्ध कर्मचारी अशी नाना रूपे या गोंधळात दिसून येत असतात. आता ज्युनिअर विरुद्ध सिनिअर असा वाद रंगला आहे. यात तुर्तास विद्यापीठ प्रशासन स्तब्ध आहे. जनसंवाद विभागाचा विद्यार्थी असलेल्या गौरव चव्हाण याला विद्यापीठाच्या तीन विद्यार्थ्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.
काही वरिष्ठ विद्यार्थी हे कनिष्ठ विद्यार्थ्यांवर असे हल्ले करीत असल्याचा आरोप होत आहे. या प्रकारांनी घाबरलेल्या कनिष्ठ विद्यार्थ्यांनी दाद मागितली. विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हे प्रकरण सांगितले. तेव्हा २५ फेब्रुवरीपर्यंत कारवाई करण्याचे आश्वासन मिळाले. ही मुदत उलटली पण अद्याप कारवाई झाली नसल्याचे अन्यायग्रस्त विद्यार्थी सांगतात. नंतर हे प्रकरण विद्यापीठाच्या अनुशासन समितीच्या विचारार्थ ठेवण्यात आले असून समितीचा अहवाल आल्यानंतर कारवाई करण्याचे आश्वासन मिळाले. मात्र यात तथ्य नाही कारण अन्याय करणारे वरिष्ठ विद्यार्थी हे विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जवळचे आहेत. त्यामुळेच कारवाई होत नसल्याचा आरोप होतो. यात न्याय मिळण्यास नाहक विलंब होत आहे. उशीर करायचा व मग प्रकरण दडपून टाकायचे, असा डाव असल्याचा आरोप गौरव चव्हाण याने केला. कारवाई होत नसल्याने आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर बसून दाद मागत आहोत. तसेच हा सत्याग्रह न्याय मिळेपर्यंत सुरूच राहणार असल्याचे गौरव चव्हाण याने स्पष्ट केले आहे.
सत्याग्रहाचा हा प्रकार विद्यापीठाची प्रतिष्ठा चव्हाट्यावर आणणारा ठरत आहे. यापूर्वी या हिंदी विद्यापीठात देशाच्या राष्ट्रपती दीक्षांत सोहळ्यास येणार होत्या. पण त्याचवेळी विद्यापीठ एका भलत्याच प्रकरणाने चर्चेत आल्याने राष्ट्रपतींनी वेळेवर आपली येथील भेट रद्द केल्याची चर्चा झाली होती. तसेच प्रजासत्ताक दिनी वाद रंगला होता. काही विद्यार्थ्यांवार निलंबनाची कारवाई झाल्याने ते आमरण उपोषणास बसले होते. ही कारवाई सुडबुद्धीने झाल्याचा आरोप त्यांनी केला. त्यापैकी एका विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने त्यास नागपूरला नेण्यात आल्याने प्रकरण चिघळले होते. संतप्त विद्यार्थ्यांनी जाब विचारल्यावर त्यांना मारहाण झाल्याने ते थेट पोलीस दारी पोहचले होते. अनेक प्रकरणात या ठिकाणी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आहे.