नागपूर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात ‘बार्गेनिंग पॉवर’ उरले नाही. जे मिळेल ते घ्या नाहीतर घरी विश्रांती करा, अशी स्थिती भाजपने सरकारने या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची करून ठेवली आहे, असा टोला माजी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला. ते आज नागपुरात माध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा >>> ‘झीनत’ला परत आणण्यासाठी वनविभागाचे जोरदार प्रयत्न; नेमक झालं काय?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्ली गाठली. त्यांनी तेथे अनेक वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. यावेळी मंत्रिमंडळातील संभावित नावांवर चर्चा झाल्याचे फडणवीस यांनी सांगितले. त्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार किंवा खातेवाटपावरून कोणताही वाद नसल्याचा खुलासा देखील दिल्लीत केला. तसेच शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने कोणाला मंत्रीपद द्यावे, हा त्या पक्षाचा प्रश्न आहे. त्यात भाजप हस्तक्षेप करणार नसल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. दरम्यान, ५ डिसेंबरला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला. त्यानंतर हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल, असे सांगण्यात आले.
हेही वाचा >>> “संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
नागपुरात हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबरपासून सुरू होत आहे. विधिमंडळ सचिवालयाचे कामकाज आज पासून सुरू झाले आहे. नागपुरात ४० मंत्र्यांचे निवासस्थान सज्ज करण्यात आले आहे. मात्र, मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. उपमुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार हे काही महत्वाचे खाते मिळण्यासाठी आग्रही असल्याचे समजते, अशी विचारणा वडेट्टीवार यांच्याकडे करण्यात आली. त्यावर वडेट्टीवार म्हणाले, शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे ‘बार्गेनिंग पॉवर’ शिल्लक नाही. भाजप सरकारने त्यांची फार वाईट स्थिती करून ठेवली आहे. ते सरकारमधून बाहेर पडू शकत नाही आणि सरकारमध्ये राहून हवे ते मिळवू शकत नाही. त्यांची अवस्था धरले तर चावते आणि सोडलेतर पळते, अशी झाली आहे.
© The Indian Express (P) Ltd