आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात भारतीय जनता पक्षाकडून कुठलाही प्रस्ताव आलेला नाही किंवा दोन्ही पक्षातील नेत्यांची कोठेही बैठक झालेली नाही. युतीसंदर्भात भाजपकडून केवळ अप्रचार केला जात असल्याचा आरोप शिवसेनेचे नेते खासदार आनंदराव अडसूळ यांनी केला.
शिवसेनेच्या पूर्व आणि पश्चिम विभागाच्या पदाधिकाऱ्यांची नागपुरात बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीनंतर बोलताना अडसूळ प्रसार माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की, सध्या भाजपकडून युती संदर्भात कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. तसेच शिवसेनेच्या वतीने भाजपसोबत युतीसंदर्भात कुठलीही चर्चा झालेली नाही. भाजपकडून केवळ आम्ही प्रस्ताव दिला, आता शिवसेनेला निर्णय घ्यायचा आहे असे वक्तव्य करून अपप्रचार करण्यात येत आहे. यासंदर्भात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बैठक झाल्यानंतर हे प्रथमच जाहीर करत असल्याचे अडसुळ यांनी सांगितले. लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत केवळ प्रस्तावावर भाजपचे नेते वक्तव्य करीत आहेत. प्रत्यक्षात शिवसेनेकडून अशी कुठलीही चर्चा नाही किंवा बैठक झाली नाही. भाजप जनतेची दिशाभूल करण्याचे काम करीत असल्याचा आरोप अडसूळ यांनी केला. प्रस्ताव आल्यावर तो योग्य की अयोग्य यावर विचार करावा लागेल आणि त्यात नंतर बदल करावा लागेल. या संबंधीचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील, असेही अडसुळ म्हणाले. शिवसेनेला पटकावणारा अजुन जन्माला यायचा आहे असेही अडसूळ म्हणाले.