नागपूर : भारतीय जनता पक्ष हा ४५ वर्षांचा झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात २०१४ ला आपल्याला स्वबळावर जनतेने निवडून दिले. आज देशातील १६ राज्यांत भाजप स्वबळावर सत्तेत असून २१ राज्यांत मित्रपक्षांसह सरकारमध्ये आहे. असे असतानाही भाजपने लोकशाही सोडली नाही व घराणेशाही कधीही अंगीकारली नाही. हा पक्ष कायम कार्यकर्त्यांचाच राहिला. त्यामुळेच एक चहा विकणारा देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
भाजप स्थापना दिनानिमित्त (ऑनलाइन) आयोजित कार्यकर्ता संमेलनात फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. या वेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजप सहसंघटनमंत्री शिवप्रकाश, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबई अध्यक्ष आशीष शेलार आदींची उपस्थिती होती.
राष्ट्र प्रथम ही आमची शिकवण आहे. आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींनी सर्वाधिक भाजप व संघाच्या लोकांना कारागृहात टाकले. देशाचे संविधान वाचवण्यासाठी कुठलाही अपराध नसताना आमचे लोक दोन वर्षे कारागृहात राहिले. त्यानंतर देशात जनता पक्षाचे सरकार आले. परंतु, कम्युनिस्ट पक्ष आणि इतरांमुळे जनता पक्ष फुटला. अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाची स्थापना होऊन भाजपचे सरकार आले. आज पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा आपण देशात सरकारमध्ये आहोत. भारताची यशस्वी घोडदौड जगातील अनेक देश आश्चर्यचकित करीत आहे. आज देशातील अनेक राज्यांत भाजपचे सरकार आहे. परंतु, हा केवळ कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. येथे लोकशाहीलाच महत्त्व आहे. या वेळी फडणवीस यांनी महाराष्ट्रातील भाजपच्या इतिहासाला उजाळा दिला.
‘पक्षामुळेच सत्ता’
सरकार आणि पक्ष यात समन्वय आवश्यक आहे. सरकारमध्ये असलो तरी आमच्या मनात भाजप आहे. पक्षामुळे आम्ही सत्तेत आहोत याची जाणीव आहे. पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सरकारचे अनेक उपक्रम जनतेपर्यंत नेण्याची आवश्यकता आहे, असेही फडणवीस म्हणाले.
‘उद्धव सेनेमुळे सरकार गेले’
महाराष्ट्रात पहिल्यांदा १९९५ला युतीमध्ये राज्यात आपण सरकारमध्ये आलो. त्यानंतर पंधरा वर्षे संघर्ष केला आणि २०१४ साली पुन्हा सरकारमध्ये आलो. पाच वर्षे राज्यात आपण उत्तम काम केले. त्यानंतर लोकांनी पुन्हा निवडून दिले. परंतु, उद्धव सेनेने गद्दारी केल्याने आपले सरकार गेले. अडीच वर्षांनी पुन्हा सरकार आले. २०२४ ला भाजपला अभूतपूर्व यश मिळाले. हे भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या परिश्रमाचे यश असल्याचेही फडणवीस म्हणाले.