महापालिकेत महिला व बाल कल्याण विभागाच्यावतीने महिलांच्या उत्थानासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. परंतु, बालकांसाठी मात्र एकही योजना राबवली जात नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
महापालिकेत महिला व बालकांसाठी विविध योजना राबवण्यासाठी स्वतंत्रपणे महिला व बाल कल्याण समिती असून समाज कल्याण विभागाअंतर्गत ही समिती काम करते. महापालिका प्रशासनाकडून महिलांसाठी उद्योजक मेळावा, शिलाई मशीन वाटप अशा विविध योजना राबवल्या जातात. परंतु, बालकांसाठी अशा कुठल्याच योजना नाही. महिला व बालकांच्या विकासासाठी महापालिकेच्या विविध योजना राबवण्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद केली जाते. मात्र, हा निधी केवळ महिलांसाठी राबवण्यात आलेल्या उपक्रमावर खर्च केला जात असल्यामुळे बालकांच्या विकासाचे काय, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा- नागपूर : धक्कादायक! प्रजापती दाम्पत्याद्वारे स्वत:च्याच पाच बाळांची विक्री?
समाजातील वंचित, निराधार, अनाथ, दुर्लक्षित आणि अपराधी बालकांची काळजी घेणे, त्यांना संरक्षण देणे, शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण देणे, निराधार, अनाथ आणि दुर्लक्षित बालकांना कौटुंबिक आधार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, बालकांमधील गुन्हेगारीचे प्रमाण कमी करणे, बाल हक्क आणि न्यायाविषयी समाजात जाणीव जागृती करणे इत्यादी विषय या महिला व बाल कल्याणाच्या माध्यमातून राबवण्याची गरज आहे. मात्र, महापालिकेत या दृष्टीने एकही विषय हाताळण्यात आला नसल्याचे समोर आले आहे. महापालिकेत बालकांसाठी कुठल्या योजना आहेत, याबाबत प्रशासनाला विचारणा करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाकडून अशा कुठल्या योजना नसल्याचे सांगण्यात आले, असल्याची माहिती महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती दिव्या धुरडे यांनी दिली.
हेही वाचा- नागपूर : ‘समृध्दी महामार्गाचे उद्घाटन जानेवारीत’; फडणवीस यांचे सूतोवाच
‘पीएम-केअर्स’ योजनेतून मदत
कोविडमुळे नागपुरात १०३५८ मृत्यू झाले. यामध्ये अनेक मुलांनी त्यांचे आई व वडील दोन्हीही गमावले. नागपूर जिल्ह्यात ही संख्या ७९ आहे. या अनाथ मुलांच्या मदतीसाठी केंद्र व राज्य सरकारसह अनेक स्वयंसेवी संस्थांनी मदतीचा हात पुढे केला. या मुलांचे भविष्य नव्याने घडवण्यासाठी पीएम-केअर्स योजनेतून प्रत्येकी १५ लाखांची मदत करण्यात आली. यातून आरोग्य विमा, शिक्षण, मासिक वेतन आणि इतर लाभ त्यांना मिळतील. माजी महापौर संदीप जोशी यांनी ‘सोबत पालकत्व’ या प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक कुटुंबांना आधार दिला.