लोकसत्ता टीम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नागपूर : अयोध्येतील रामजन्मभूमीचे आंदोलन ज्या संतांच्या मागदर्शनाखाली करण्यात आले अशा चार हजार संतांना निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे निमंत्रणावरून जी काही चर्चा सुरू आहे त्यात काही तथ्य नाही, असे मत विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र आणि गोवा शाखेचे महामंत्री गोविंद शेंडे यांनी व्यक्त केले. रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी देशभरात दिवाळी साजरी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शेंडे यांनी लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी ते बोलत होते. शेंडे म्हणाले, देशभर राममय वातावरण निर्माण झाले आहे. मंदिरात आणि वस्त्यांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. अयोध्येतील राममंदिराचे काम जवळपास पूर्ण झाले असून पहिल्या माळ्यावर रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि त्याच्यावर रामदरबार राहणार आहे.
या सोहळ्यासाठी रामजन्मभूमी न्यासतर्फे साडेसात हजार लोकांना आमंत्रित करण्यात आले. यात विविध पीठांचे शंकराचार्यही आहेत. परंतु, त्यातील काहींनी प्रकृती अस्वस्थामुळे तर काहींनी त्यांच्यावरील बंधनांमुळे येऊ शकत नसल्याचे कळवले आहे. विश्व हिंदू परिषद, संघ किंवा भाजपने निमंत्रणे दिली नाहीत तर रामजन्मभूमी न्यास ट्रस्टच्यावतीने ती देण्यात आली आहेत. विहिंप, संघ, भाजप व अन्य संघटना केवळ ट्रस्टला सहकार्य करीत आहेत.
आणखी वाचा-राम मंदिर उद्घाटनाच्या दिवशी काळे वस्त्र घालून आंदोलनाचा इशारा, काय आहे प्रकरण जाणून घ्या सविस्तर
अयोध्येला विविध पंथांच्या संतांशिवाय ज्यांनी भारताचा लौकिक वाढवला अशा भारतरत्न, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार प्राप्त मान्यवरांसह भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करण्यामध्ये ज्यांचा मोठा वाटा आहे अशांना निमंत्रित करण्यात आले आहे. २२ तारखेला मंदिराच्या गर्भगृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल असे केवळ चारजण प्रवेश करतील.
सर्वांना अयोध्येला जाणे शक्य नाही. त्यामुळे ‘मेरा गाव मेरी अयोध्या’ म्हणून गावागावात आणि शहरांमध्ये हा उत्सव साजरा केला जाणार आहे. घरांवर, मंदिरावर, चौकाचौकात भगवे ध्वज, दिवे आणि आकर्षक रोषणाई करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. दरवर्षी २२ जानेवीराला हा उत्सव साजरा केला जाईल, असा विश्वास आहे. यवतमाळ येथून विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते अयोध्येत व्यवस्थेसाठी गेले आहेत. दोन हजारपेक्षा जास्त संतांची व्यवस्था ते सांभाळणार आहेत. शिवाय नागपूरच्या शिव शक्ती मंडळाचे कार्यकर्ते अयोध्येत वेगवेगळी सेवा देणार असल्याचे शेंडे यांनी सांगितले.
आणखी वाचा-अपघात पीडित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयापुढे ‘राम नाम जप’ करणार! जाणून घ्या कारण…
संतांवर टीका योग्य नाही
शंकाराचार्य किंवा कुठल्याही संतांवर टीका करणे योग्य नाही. ते सर्वांसाठी पूज्यनीय आहेत. जे टीका करतात त्यांच्या टीका आम्ही गांभीर्याने घेत नाही. राम मंदिर मूळ जागेवर नाही असाही आरोप केला जात आहे. मात्र ज्यांना विरोध करायचा असे काही लोक कुठल्याही गोष्टीला विरोध करतात. मात्र अशा लोकांना समाजात फारशी किंमत राहत नाही. ज्या ठिकाणी चबुतरा तयार करण्यात आला होता ती जागा प्रभूरामचंद्राचे जन्मस्थळ आहे, हेच खरे वास्तव असल्याचे शेंडे यांनी स्पष्ट केले.
ज्या हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे राममंदिर व्हावे असे स्वप्न होते त्या बाळासाहेबांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांनी जी भूमिका घेतली ती बघता त्यांच्या हिंदुत्वाचा ऱ्हास झाल्याचे दिसते, अशी टीका शेंडे यांनी केली.