अकोला : सूर्यमालेत आठ ग्रह असून पृथ्वीवरून बुध, शुक्र, मंगळ, गुरु व शनी हे पाच ग्रह सहजरित्या पाहता येतात. एकासोबत पाच ग्रह दर्शनाची सुवर्ण संधी नववर्षाच्या प्रारंभीच नभांगणी उपलब्ध झाली. या विलोभनीय दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन विश्वभारती केंद्राचे प्रमुख प्रभाकर दोड यांनी केले आहे.
मंगळ व बुध ग्रहांचा नुकताच उदय झाल्याने ते पहाटे सूर्योदयापूर्वी पूर्व आकाशात दर्शन देतील. ११ जानेवारीची आकाश स्थिती, १२ ला बुध सूर्य परम इनांतरावर असल्याने बुध दर्शन सोपे होईल. १३ ला पृथ्वी व चंद्र जवळ असतील. सूर्यमालेत सर्वात तेजस्वी असलेला शुक्र ग्रह पूर्व क्षितिजावर अधिराज्य गाजवत आहे. सूर्यमालेतील सर्वात मोठा गुरु ग्रह सध्या संध्याकाळी आकाश मध्याशी, तर सर्वांग सुंदर वलयांकित शनी ग्रह पश्चिम क्षितिजावर दर्शनासाठी सज्ज आहे. दुर्बिणीतून ग्रहांचे दर्शन डोळ्यांचे पारणे फेडल्याशिवाय राहत नाही, असे प्रभाकर दोड म्हणाले.
हेही वाचा – “गुन्हेगारांच्या स्थानबद्धतेत होणारा विलंब समाजासाठी धोकादायक,” उच्च न्यायालय म्हणाले…
सूर्यापासून ग्रहाचे अंतर जास्त तेवढा त्याचा परिभ्रमण कालावधी अधिक या प्रमाणात गुरु ग्रह सूर्याभोवतीची एक प्रदक्षिणा पूर्ण करायला अंदाजे बारा वर्षे घेतो. सध्या गुरु हा ग्रह राशीचक्रातील मेष राशीत, तर शनी ग्रह हा कुंभ राशी समूहात पाहता येईल. शनी-चंद्र युती १४ ला व गुरु चंद्र युती १८ जानेवारीला घडून येईल, असे दोड यांनी सांगितले.
हेही वाचा – उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांची डोकेदुखी वाढणार; ‘या’ रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या रद्द
फिरत्या चांदणीचा थरार
आकाशामध्ये फिरत्या चांदणीच्या स्वरुपात आंतरराष्ट्रीय अंतराळ अभ्यास व संशोधन केंद्र पृथ्वीभोवती २७ हजार ५०० कि.मी. या प्रचंड वेगाने फिरते. ११ जानेवारीला सायंकाळी ७.२१ ते ७.२४ या वेळात नैऋत्येकडून उत्तरेकडे आणि १२ जानेवारीला संध्याकाळी ६.३२ ते ६.३८ वाजता दक्षिणेकडून इशान्येकडे ठळक स्वरूपात नुसत्या डोळ्यांनी पाहता येईल. आकाशातील ग्रहांविषयीचे गैरसमज दूर करून आकाशाशी नाते जोडावे, असे आवाहन प्रभाकर दोड यांनी केले.