नागपूर : व्याघ्रपर्यटनाच्या जागतिक नकाशावर ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाचे नाव अग्रक्रमावर. मग या व्याघ्रप्रकल्पातील वाघांची आणि वन्यप्राण्यांची सुरक्षा देखील जागतिक दर्जाचीच असायला हवी. अत्याधुनिक तंत्रज्ञानांनी युक्त ‘थर्मल ड्रोन’ ने आता या सुरक्षेची जबाबदारी स्वीकारली आहे. ताडोबातील व्याघ्रदर्शनासाठी जगभरातून पर्यटक येत असताना या व्याघ्रप्रकल्पाच्या तसेच वाघ व इतरही वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी अनेक हात समोर येत आहेत.
पुण्यातील अशाच एका डीपी वर्ल्ड कंपनीने वाघ व इतरही वन्यप्राण्यांच्या सुरक्षेची जबाबदारी स्विकारत या व्याघ्रप्रकल्पाला अत्याधुनिक ‘थर्मल ड्रोन्स’ पुरवले. वनखात्यातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना हे ‘ड्रोन’ चालवण्यासाठी वर्षभर प्रशिक्षण तसेच सहाय्य देखील दिले जाणार आहे. हे ‘ड्रोन्स’ डीजीआयच्या ‘मॅव्हिक थ्री एण्टरप्राइज’ सीरिजमधील ‘ड्रोन्स’ आहेत. ते थर्मल इमेजिंग कॅमेरा, यांत्रिक शटर, झूम कॅमेरा व सेंटीमीटर स्तरावरील अचूकतेसाठी आरटीके प्रारूप (रिअल-टाइम कायनेमॅटिक) ह्यांनी सुसज्ज आहेत. त्यामुळे निरीक्षणादरम्यान अधिक चांगले मानचित्रण (मॅपिंग) करता येते.
ज्या भागांत प्रत्यक्ष पोहोचणे शक्य नाही, तेथील माहिती संकलित करण्यासाठी, जलाशयांच्या स्तरांचे मापन करण्यासाठी तसेच नकाशे तयार करण्यासाठी हे ‘ड्रोन्स’ उपयुक्त ठरतील. त्यामुळे जैवविविधतेचे दस्तावेजीकरण अधिक चांगले होईल. शिवाय, ‘ड्रोन्स’मधील ‘थर्मल इमेजिंग’ क्षमतांमुळे, जमिनीवरील आगीची लक्षणे अधिक लवकर ओळखण्यात वनखात्याच्या क्षेत्र कर्मचाऱ्यांना मदत होईल. बचावाचे कार्य व वन्यजीवांचा माग ठेवण्याची क्षमता ह्यात सुधारणा होईल. वनातील गुन्हे कमी होतील आणि वनातील क्षेत्र कर्मचारी व स्थानिक समुदायांच्या सुरक्षिततेचीही निश्चिती होऊ शकेल.