नागपूर : वाघांची अवैध शिकार थांबविण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तसेच तपास करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरासह थर्मल ड्रोन चा वापर करण्याचा निर्णय जिल्हास्तरीय व्याघ्र समितीच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत वनविभाग, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, वीज वितरण विभाग, रेल्वे पोलीस, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागातील अधिकारी उपस्थित होते. गुरुवारी उच्च न्यायालयात ही माहिती सादर करण्यात आली.

वाघांचा रस्ता अडवणूक प्रकरणी उच्च न्यायालयाने स्वत:हून जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेत वाघांच्या अवैध शिकारीचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. गुरुवारी झालेल्या सुनावणीत नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी उच्च न्यायालयात शपथपत्र दाखल केले. शपथपत्रातील माहितीनुसार, २४ जानेवारी रोजी सर्व संबंधित विभागाची संयुक्तरित्या बैठक घेण्यात आली. यात अपघातप्रवण क्षेत्रात फलक लावणे, अनधिकृत वीजेचे कनेक्शन कापणे, मोबाईलच्या वापरावर प्रतिबंध घालणे, जीपीएस तंत्रज्ञान, डॅश कॅमेराचा वापर करणे यासह विविध उपाययोजनाबाबत निर्देश देण्यात आले. उच्च न्यायालयाने याप्रकरणी गुरुवारी नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांना प्रतिवादी करत पुढील सुनावणी २७ मार्च रोजी निश्चित केली.

थर्मल ड्रोन म्हणजे काय?

थर्मल ड्रोन म्हणजे अशा प्रकारचा ड्रोन जो थर्मल इमेजिंग कॅमेरा वापरतो. हा कॅमेरा इन्फ्रारेड किरणांद्वारे वस्तूंचे तापमान ओळखतो आणि त्याचे थर्मल प्रतिमेत रूपांतर करतो. यामुळे दृष्टीला न दिसणाऱ्या उष्णतेच्या पातळीसह गोष्टी सहज पाहता येतात. थर्मल ड्रोनमुळे मानवी डोळ्यांना न दिसणाऱ्या गोष्टी स्पष्टपणे पाहता येतात, ज्याचा वापर विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो.

अनैसर्गिक मृत्यु नाही

नागपूर जिल्ह्यात मागील एका वर्षात एकही वाघाचा अनैसर्गिक मृत्यु झाला नसल्याचा दावा पोलीस अधीक्षकांनी केला. रामटेक भागात झालेला वाघाचा मृत्यु हा नैसर्गिक होता, असेही यात स्पष्ट करण्यात आले. नागपूर विभागाच्या अंतर्गत रेल्वे पोलिसांनी देखील एकाही वन्यजीव प्राण्याच्या मृत्युची तक्रार केली नाही. दुसरीकडे, तोतलाडोह येथे अवैध मासेमारी थांबविण्यासाठी मध्यप्रदेश पोलिसांच्या सहकार्याने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. अवैध मासेमारी करणाऱ्यांनी प्रवेश करू नये यासाठी फ्लोटिंग बॅरिअर लावण्यात आले आहेत. तोतलाडोह येथे पोलिसांवर हल्ला प्रकरणात चौकशी प्रगतीपथावर आहे. याप्रकरणी पाच लोकांची आरोपी म्हणून निश्चिती करण्यात आली असून अद्याप आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नसल्याचे पोलीस अधीक्षकांनी न्यायालयात सांगितले.