नागपूर : घरफोडी, लुटमार किंवा दरोडा टाकणाऱ्या टोळ्यांची दहशत नव्हे तर चक्क कारने येऊन शेळ्या चोरणाऱ्या टोळीचा धसका नागपूरकरांनी घेतला होता. मात्र, पाचपावली पोलिसांनी या टोळीला जेरबंद केले. तिघांना अटक केली असून दोघांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाईक तलाव, बैरागीपुरा येथील रहिवासी रूपा आडले (४०) आणि त्यांच्या शेजारी महिला शेळ्या पाळतात. ११ मार्चला सकाळी त्यांच्याकडील शेळ्या नाईक तलाव परिसरात चरत होत्या. दरम्यान, एक महागडी कार परिसरात थांबली.
शेळ्यांना चारा घातला आणि त्यातील तीन शेळ्या कारमध्ये कोंबून निघून गेले. शेळ्या चोरीला गेल्याचे कळताच रूपा यांनी पाचपावली ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. आरोपी शेख जुबेर आणि समीर शेख यांना ताब्यात घेतले. पोलीस कोठडीत सखोल चौकशी केली असता त्यांनी टोळीतील सदस्यांची नावे सांगितली. चोरीच्या शेळ्या खरेदी करणारा आरोपी अक्षय माहुरे यास पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच आरोपींनी रामटेक तलावाजवळ, तारसा, कामठी, वडधामना, चोकरधानी रोड आदी ठिकाणांहून शेळ्या चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी एक कार, मोबाईल, बुलेट असा एकूण साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस उपायुक्त गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैभव करत आहेत.