चंद्रपूर: चोरटे आर्थिक लाभाच्या आमिषापोटी चोऱ्या करतात. दागिणे अथवा रोख रक्कम चोरट्यांकडून चोरली जाते. मात्र, चंद्रपुरात एका चोराने केवळ पाच रुपयांसाठी वॉटर एटीएम फोडल्याचा धक्कादायक प्रकार जिल्हातील सिंदेवाही तालुक्यातील वासेरा गावात घडला. वॉटर एटीएमच्या चोरीमुळे गावात शुद्ध पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> Neet 2023 : ‘नीट’ परीक्षेत नागपूरचा तनिष्क भगत देशात २७वा

शासनाने “गाव तेथे वॉटर एटीएम ” हा उपक्रम राबविला असून या योजने अंतर्गत अनेक गावांना वाटर एटीएम उपलब्ध करून देण्यात आली आहेत. एटीएमच्या माध्यमातून पाच रुपयात गावाकऱ्यांना शुद्ध आणि थंड पाणी मिळत आहे. उन्हाळ्यात अनेक गावात पाणी टंचाई निर्माण झाली असताना वॉटर एटीएमच्या माध्यमातून गावकरी आपली तहान भागविम आहेत. मात्र, आता या एटीएमवर चोरट्यांची नजर पडली आहे. सिंदेवाही तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय वासेरा अंतर्गत चार महिन्यांपूर्वी थंड आणि शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी “वॉटर एटीएम” सुरू कण्यात आले होते. “गाव तेथे वॉटर एटीएम या शासनाच्या अभियानात जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी अंतर्गत मागील एक वर्षापासून वॉटर एटीएमचे काम सुरू होते.

हेही वाचा >>> वर्धा: डॉ.श्याम भुतडा व मनिष देशमुख यांना हर्बल औषधीसाठी पेटंट

या एटीएम मधून गावकऱ्यांना थंड आणि शुद्ध पिण्याचे पाणी मिळत होते. एटीएममध्ये पाच रुपयांचे नाणे टाकून नागरिकांना पंधरा लीटर पाणी विकत घेता येत होते. या एटीएमवर भुरट्या चोरांची नजर पडली. चोरांनी पाच रुपयासाठी वॉटर एटीएम मशीन फोडली अन पाच रुपये पळविले. चोरांचा या कृतिमुळे वॉटर एटीएम मशीन बंद पडली आहे. परिणामी शुद्ध आणि थंड पाण्यापासून गावकरी वंचित झाले आहेत. गावात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाच रुपयांसाठी एटीएम फोडणाऱ्या या चोराची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात सुरु आहे. वासेरा गावचे सरपंच महेश बोरकर, पोलिस पाटील देवेंद्र तलांडे यांनी चोरीच्या घटनेची माहिती सिंदेवाही पोलिसांना दिली. पाच रुपयांसाठी एटीएम फोडणाऱ्या या चोराचा शोध पोलीस घेत आहेत. मात्र अद्याप त्याचा थांगपत्ता लागलेला नाही.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thief broke water atm for five rupees in chandrapur rsj 74 zws