अकोला : पत्नीचे सौभाग्याचं लेणं वाचवतांना पतीचा दुर्दैवी अंत झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यात घडली. रेल्वेस्थानकावर गाडीच्या खिडकीतून महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्याने पळवले. सतर्क पतीने सिनेस्टाईल त्या चोरट्याचा जीवाच्या आकांताने धावत पाठलाग केला. काही अंतरावर चोरट्याने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. यामध्ये चोरट्याने दगडाने पतीचा चेहरा ठेचला. यात गंभीर जखमी झालेल्या पतीचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला.
अकोला जंक्शन रेल्वेस्थानकावर प्रवाश्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. या गर्दीचा फायदा घेऊन चोरटे पाकीट, मोबाइल, किंमती वस्तुंवर हात साफ करतात. चोरट्यांकडून महिलांच्या सोन्याच्या दागिन्यांना देखील मोठ्या प्रमाणात लक्ष्य केले जाते. रविवारी रात्री याच प्रकारची घटना रेल्वेस्थानकावर घडल्याने खळबळ उडाली आहे. रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक चारवर गाडी येत असतांना मंगळसूत्र चोरट्याने वर्षा हेमंत गावंडे नामक महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून पळ काढला. त्यानंतर सोबत असलेला महिलेचा पती हेमंत गावंडे यांनी मंगळसूत्र चोरट्याचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. काही अंतरावर पाठलाग करत असताना चोरट्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यामध्ये गावंडे यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यांचा चेहरा देखील दगडाने ठेचून काढण्यात आला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. आरोपीने पतीच्या हातातील ब्रेसलेट व मोबाइल देखील पळवला. घटनास्थळावर हेमंत गावंडे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते.
स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात नेण्यात आले. हेमंत गावंडे यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. मंगळवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मंगळसूत्र चोरून हल्ला करणाऱ्या आरोपीच्या शोधार्थ पोलीस पथके विविध दिशेने रवाना झाली होती. त्या आरोपीची माहिती देणाऱ्यासाठी बक्षीस देखील पोलिसांनी जाहीर केले. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांच्या पथकाने आज सकाळी शहरातूनच आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी रवी नथ्थुलाल परमार (३९, रा.कुंदाना, जि. इंदोर, मध्य प्रदेश) याला अटक केली. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी चोरी व शस्त्राच्या गुन्ह्यात फरार होता. तो ११ मार्चपासून शहरातील बलोदे लेआऊटमध्ये भाड्याच्या घरात राहत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपीला रामदास पेठ पोलिसांच्याा ताब्यात देण्यात आले असून गुन्ह्यामध्ये हत्येच्या कलमाची वाढ केली आहे.