अकोला : रेल्वेस्थानकावर गाडीची वाट पाहत उभ्या असलेल्या विवाहित महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्याने पळवले. सतर्क पतीने सिनेस्टाईल त्या चोरट्याचा पाठलाग केला. चोराला पकडण्यासाठी पती जीवाच्या आकांताने धावत असतांनाच काही अंतरावर चोरट्याने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. यामध्ये चोरट्याने दगडाने पतीचा चेहरा देखील ठेचला. या गंभीर घटनेत पती गंभीर जखमी झाला असून शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. ही धक्कादायक घटना रविवारी रात्री अकोला रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक चारवर घडली.

अकोला जंक्शन रेल्वेस्थानकावर प्रवाश्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. या गर्दीचा फायदा घेऊन चोरटे पाकीट, मोबाइल, किंमती वस्तुंवर हात साफ करतात. चोरट्यांकडून महिलांच्या सोन्याच्या दागिन्यांना देखील मोठ्या प्रमाणात लक्ष्य केले जाते. रविवारी रात्री याच प्रकारची घटना रेल्वेस्थानकावर घडल्याने खळबळ उडाली आहे. रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक चारवर मंगळसूत्र चोरट्याने गावंडे नामक विवाहित महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून पळ काढला. त्यानंतर सोबत असलेला महिलेचा पती हेमंत गावंडे यांनी मंगळसूत्र चोरट्याचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. काही अंतरावर पाठलाग करत असताना चोरट्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यामध्ये गावंडे यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यांचा चेहरा देखील दगडाने ठेचून काढण्यात आला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले.

घटनास्थळावर ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. हेमंत गावंडे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस अकोला रेल्वेस्थानकावर घटनास्थळी दाखल झाले. शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुळकर्णी, स्थानिक गुन्हे शाखा, स्थानिक पोलिसांचे पथक, रेल्वे पोलिसांनीही घटनेचा तपास सुरू केला. मंगळसूत्र चोरट्याच्या शोधार्थ पथक गठीत करून कसून शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे रेल्वेस्थानक परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

कायदा व सुव्यवस्था ढासळली

अकोला रेल्वेस्थानक व परिसरात गुन्हेगारी कारवायांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. रेल्वे पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला नसल्याचे चित्र आहे. रेल्वेस्थानकावर चोरट्यांचा धुमाकूळ असून प्रवाश्यांचे मौल्यवान वस्तू चोरीला जात आहेत. रविवारी मंगळसूत्र चोरट्याचा पाठलाग केला तर त्याने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले. रेल्वेस्थानक परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढविण्याची मागणी केली जात आहे.

Story img Loader