वर्धा, विकासाचा महामार्ग म्हणून पुरुस्कृत झालेला नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग सतत वेगळ्या कारणांनी आजवर चर्चेत राहला आहे. सातत्याने होणारे अपघात, अनियंत्रित वेगाने वाहणारी वाहने, चालत्या वाहनावर दगडफेक, टोल कर्मचाऱ्यांचा संप, कॅन्टीनवर गैरसोय अशी समृद्धी मार्गाची चर्चा विविध कारणांनी होत आहे. आता तर थेट लूटमार झाली आहे. सर्व प्रवासी या घटनेने भयभीत झालेले आहेत.
पुण्यावरून नागपूरला जाणाऱ्या बसमधील प्रवासी या घटनेचे साक्षीदार आहेत. विजयानंद ट्रॅव्हल बस क्रमांक एम. एच.व्ही टी. ६३६२ ही इच्छित स्थळी समृद्धीवरून निघाली. वाटेत मार्गावरील विरूळ येथे पेट्रोल पंपावर थांबली. या मार्गावरील बसेस इथेच नेहमी थांबतात. या बसमधील प्रवासी हा नियमित थांबा असल्याने या ठिकाणी चहापाणी करण्यास उतरले. त्यात नागपूरला निघालेल्या जयश्री वडसकर या सुद्धा पतिसह बस मधून उतरल्या. सोबत बॅग होती.
तेव्हा त्यांचा १५ वर्षीय मुलगा बसमध्येच बसून होता. त्यावेळी एक अज्ञात व्यक्ती बसमधील या कुटुंबाची बॅग हुडकत असल्याचे मुलास दिसून आले. तेव्हा मुलाने आरडा ओरड केली. हा आवाज इतर प्रवास्यांनी ऐकला. मात्र काही लक्षात येण्यापूर्वीच सदर व्यक्तीने बसमधून पळ काढला. त्यावेळी बाजूलाच क्रेटा कार उभी होती. त्यात बसून हा व्यक्ती लगेच पसार झाला. ही घटना घडताच मोठा कल्लोळ उडाला.
घटनेची माहिती पुलगाव पोलिसांना कळली. पोलीस चमुने सीसीटीव्ही फुटेज तपासून ते ताब्यात घेतले. फिर्यादी जयश्री वडसकर यांची तक्रार नोंदवून घेतली आहे. बॅगमधून ११ तोळे ४० ग्राम सोने तसेच अन्य दागिने चोरट्यानी लंपास केले आहे. त्याची एकूण किंमत ३ लाख ४२ हजार रुपये असल्याचे सांगण्यात येते. पुलगाव पोलीस या प्रकरणी पुढील तपास करीत आहे.
ही घटना पोलिसांसाठी एक आव्हान ठरले आहे. कारण कार घेऊन येत प्रवासी हेरून ही लूटमार झाली आहे. नव्या दंड संहितेनुसार दरोडेखोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. लूटमार करण्यासाठी वापर झालेली गाडी ही महाराष्ट्र पासिंगची आहे. तांत्रिक प्राथमिक माहितीनुसार गाडी महाराष्ट्राबाहेर गेल्याचे निष्पन्न झाले आहे. लवकरच या दरोडेखोरांचा तपास लागण्याची खात्री पोलीस देत आहे. सदर महिला प्रवासी दागिने बाळगून असल्याची बाब बाहेर कशी माहित पडली, हा मुद्दा आहेच.