एका चोरट्याने हनुमानजींच्या मंदिरात प्रवेश केला. हनुमानजींचे दर्शन घेतले. मंदिराला प्रदक्षिणा मारल्या आणि प्रसाद ग्रहण केला. नंतर हनुमानजींचे दर्शन घेऊन जवळपास दीड किलो वजनाची गदा चोरून पसार झाला. ही घटना कन्हानमधील मंदिरात उघडकीस आली. सर्व प्रकार ‘सीसीटीव्ही फुटेज’मध्ये कैद झाला असून कन्हान पोलिसांनी गदा चोरी गेल्याचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्हानच्या रोडवर एक हनुमान मंदिर आहे. मंदिरात सकाळी आणि रात्री भाविकांची मोठी गर्दी असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : विश्लेषण : जिथे कमी तिथे मोदी? भाजपची लोकसभेसाठी काय आहे रणनीती?

हेही वाचा : विश्लेषण : साजिद खानमुळे पुन्हा चर्चेत आलेली MeToo मोहीम नक्की आहे तरी काय? जाणून घ्या

शनिवारी रात्रीच्या सुमारास एक चोरटा मंदिरात घुसला. त्याने मंदिरातील घंटा वाजवली. बाजूला ठेवलेली फुले घेतली आणि हनुमानजींच्या चरणावर ठेवून दोन्ही हात जोडून दर्शन घेतले. त्यानंतर मंदिराला प्रदक्षिणा मारल्या. त्यानंतर हनुमानजींचे पुन्हा दर्शन घेतले आणि प्रसाद ग्रहण केला. कानाला दोन्ही हात लावून माफी मागितली आणि हनुमानजींची दीड किलो वजनाची पितळी गदा आणि अगरबत्ती लावण्याचे पितळीचे स्टँड सोबत आणलेल्या पिशवीत घातले.

हेही वाचा : नागपूर : शरीरसंबंधास नकार दिल्यास आत्महत्या करण्याची तरुणाची मैत्रिणीला धमकी

जाताना पुन्हा हनुमानजींकडे बघून तो चोर निघून गेला. शनिवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास पुजारी श्यामसुंदर पिपलवा (आंबेडकर चौक, कन्हान) आणि कार्यकर्ते भीमसिंग ठाकूर हे पूजा करण्यासाठी मंदिरात आले. त्यांना हनुमानजींची गदा चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी लगेच मंदिर व्यवस्थापकांंना माहिती दिली. श्यामसुंदर यांनी कन्हान पोलीस ठाण्यात गदा चोरीला गेल्याची तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चोराचा शोध सुरू केला आहे.

दिवसाढवळ्या मंदिरात झालेल्या या चोरीच्या घटनेने खळबळ उडाली आहे. महिनाभरात मंदिरात झालेली चोरीची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी मंदिरातील हनुमानजींचा मुकुट चोरीला गेला होता. त्यानंतर पाच ते सहा महिन्यांनी परत मुकुट आणि कडे चोरीला गेले होते. चोरीच्या घटना लक्षात घेता मंदिर व्यवस्थापनानाकडून मंदिरात ‘सीसीटीव्ही’ लावण्यात आला. त्यानंतर गेली दोन वर्षे चोरी झाली नाही. मात्र, आता ही चोरीची घटना उघडकीस आली. पोलीस ‘फुटेज’वरून चोरट्यांचा शोध घेत आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thief theft hanuman gada in diffrent type in nagpur tmb 01
Show comments