बुलढाणा : जिल्ह्यात चोरट्यांचे धाडस चांगलेच वाढले आहे. आज बुधवारी उत्तररात्री याचा प्रत्यय पोलीस विभागासह जिल्हावासीयांना आला! या खळबळजनक घटनाक्रमात अज्ञात चोरट्यांनी चक्क शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा केंद्रीय आरोग्य, आयुष, कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रताप जाधव यांच्या मादणी या मूळ गावात चोरीचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क गावाकऱ्यांमुळे चोरांच्या टोळीचा हा प्रयत्न सपशेल फसला! आता हे चोरटे ग्रामस्थ किंवा पोलिसांच्या हाती तर लागले नाही, पण ‘सीसीटीव्ही’त मात्र ‘कैद’ झाले आहे.
केंद्रीय राज्यमंत्री जाधव आपल्या कुटुंबीयांसह विविध सण, उत्सव मादणी गावातच साजरे करतात. आज हे गाव पुन्हा चर्चेत आले ते अराजकीय आणि विचित्र कारणाने. मादणी गावात काही चोरटे पांढऱ्या रंगाच्या वाहनातून दाखल झाले. तोंडाला रुमाल, पायात स्पोर्ट शूज, हातात काठ्या असलेल्या या चोरट्यांनी बबनराव मणिराम बाजड यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील साहित्य अस्ताव्यस्त केले, परंतु काहीच हाती लागले नाही. चोरटे गावातील काही घरात डोकावून पाहात असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले. नाना मेंटागळे यांच्या घराजवळ चोरटे पोहचले तेव्हा कुत्रा त्यांच्यावर भुंकू लागला. कुत्र्याचा आवाज ऐकताच जागे झालेल्या मेंटागळे यांना संशय आल्याने त्यांनी खिडकीतून डोकावून पाहीले, तर त्यांना तोंडाला रुमाल आणि हातात काठ्या घेतलेले चोरटे दिसून आले. त्यांनी आजुबाजूला फोन केला. तोपर्यंत चोरट्यांनी बबनराव मणिराम बाजड यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील साहित्य अस्ताव्यस्त करून शोध घेतला परंतु त्यांना काहीच मिळू आले नाही. चोरटे चोरीच्या प्रयत्नात असतानाच त्यांना गावकरी जागे झाल्याची चाहूल लागताच तेथून पळ काढला. गावकऱ्यांनी चोरट्यांचा शोध घेतला परंतु ते मिळून आले नाही. सीसीटीव्ही मात्र चोरटे कैद झाले होते.
आता केंद्रीय मंत्र्यांचे गाव म्हटल्यावर डोणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी माहिती मिळताच वाऱ्याच्या गतीने गावात पोहचले. गावातील सीसीटीव्हींची पाहणी केली असता तोंड बांधलेले पाच चोरटे हातात बॅटरी, काठ्या घेतलेले दिसून आले. चोरट्यांमुळे गावात दहशतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.