अमरावती : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या कांतानगर येथील बंगल्याची कडक सुरक्षा भेदून या परिसरातून चोरट्यांनी दोन चंदनाची झाडे चोरून नेल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. शहरातून यापुर्वी मुख्य वनसंरक्षकांच्या निवासस्थानासह अनेक शासकीय अधिकाऱ्यांच्या बंगल्यांच्या परिसरातून चंदनाच्या झाडांची चोरी झाली आहे. यावेळी अज्ञात चोरट्यांनी थेट प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या घराला लक्ष्य केले आहे. या चोरट्यांना जेरबंद करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या संदर्भात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या निवासस्थानी चतुर्थश्रेणी म्हणून कार्यरत असलेल्या शुभम विनोद गोलाईत (२८) यांनी पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली की, दररोज प्रमाणे तो काल रात्री १०.४५ वाजता ‘नाईट ड्युटी’साठी न्यायाधीशांच्या बंगल्यावर पोहोचला आणि रात्री एक वाजेपर्यंत पोर्चमध्ये खुर्चीवर बसून होता. त्यानंतर त्याने पोर्चमध्येच अंथरूण टाकले आणि तो झोपला. रात्री दोन वाजताच्या सुमारास न्यायाधीशांनी अचानक दरवाजा उघडून त्याला झोपेतून उठवले आणि बाहेरून कशाचा तरी आवाज आल्याचे सांगितले. त्यानंतर तो न्यायाधीशांसह पोर्चमधून बाहेर पडला असता तेथे चंदनाचे झाड कापलेले दिसले, त्यामुळे त्यांनी ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना हाक मारली आणि मागच्या बाजूला जाऊन पाहण्यास सांगितले. तर बंगल्याच्या मागील भागातील चंदनाचे झाडही तोडण्यात आल्याचे दिसून आले. या दोन्ही झाडांचे वय सुमारे ५ वर्षे असून, ज्यांच्या लाकडाची बाजारातील किंमत सुमारे २० हजार रुपये आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून तत्काळ अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू केला.

गेल्या वर्षी जून महिन्यात येथील मुख्‍य वनसंरक्षकांच्‍या कॅम्‍प येथील रॅलिज या शासकीय निवासस्‍थानाचा परिसर आणि एसडीएफ प्राथमिक शाळेच्‍या आवारातील तीन चंदन वृक्ष कापून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्‍याचा प्रकार उघडकीस आला होता. मुख्‍य वनसंरक्षकांच्‍या (प्रादेशिक) शासकीय निवासस्‍थान परिसरातील एक चंदनाचे झाड अज्ञात ५ ते ७ जणांनी कटर मशिनच्‍या साहाय्याने कापून चोरून नेले होता. याशिवाय या परिसरातील अन्‍य चार चंदनाच्‍या झाडांना आरा मारण्‍यात आला होता. याशिवाय एसडीएफ प्रायमरी स्‍कूलच्‍या प्रांगणातील २ वृक्ष चोरट्यांनी चोरून नेली. या तीनही झाडांची किंमत सुमारे २० हजार रुपये इतकी होती. शहरातील शासकीय अधिकाऱ्यांची निवासस्थाने आता चंदन तस्करांचे लक्ष्‍य बनल्याचे या घटनांमधून दिसून आले आहे.