बुलढाणा : सामाजिक राजकीय दृष्ट्या संवेदनशील आणि गुन्हेगारीचे जास्त प्रमाण असलेल्या खामगाव शहरांत चोरट्यांचे मनोधैर्य कमालीचे वाढल्याचे चित्र आहे. आज, मंगळवारी चार जानेवारीला झालेल्या एका चोरीच्या घटनेत चोरांनी चक्क एटीएम सोबत नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ताकद अपुरी पडल्याने अखेर लाखो रुपयांची रक्कम असलेले हे मशीन रस्त्यावर सोडून पळ काढण्याची वेळ त्यांच्यावर आली. यामुळे तेल गेले, तूप गेले हाती धुपाटणे आले अशी वेळ अज्ञात चोरांवर आली.
बँकेचे एटीएम असलेल्या परिसरात तिसरा डोळा अर्थात सिसिटीव्ही लावलेला असल्याने हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात मागील काही दिवसांपासून दररोज चोरीच्या घटना घडत आहे. चोरीच्या घटनांची एक प्रकारे मालिकाच सुरु आहे. या लहानमोठ्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यात पोलीस अपयशी ठरताना दिसत आहे. आता अज्ञात चोरट्यांनी थेट राष्ट्रीय कृत आणि खासगी मोठ्या बँकाच्या एटीएम कडे मोर्चा वळविल्याचे दिसून येत आहे.
आज मंगळवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास चोरट्यांनी खामगाव शहराला लागून असलेल्या नांदुरा रोडवरील सुटाळा बुद्रुक येथील आयडीबीआय या बँकेचा एटीएम परिसर गाठला. चोरांनी मशीन फोडण्याचा प्रयत्न केला. यावर कळस म्हणजे सदर एटीएमला दोरीने बांधून वाहनाने ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, मशीन जास्तच ‘वजनदार’ असल्याने चोरांचा प्रयत्न फसला, त्यांची धडपड वाया गेली,
असेच म्हणावं लागेल. त्यातच घटनास्थळ परिसरात झालेल्या मोठ्या आवाजामुळे पकडल्या जाण्याच्या भीतीने चोरट्यांनी एटीएम मशीन तेथेच सोडून देऊन पसार होनेच पसंत केले. घटना स्थळी खामगाव पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला. या धाडसी चोरांना पकडण्याचे कडवे आव्हान खामगाव पोलिसां समोर उभे ठाकले आहे.