अमरावती : एका व्‍यापारी संकुलातील दहा दुकानांमध्‍ये चोरी केल्‍यानंतर चोरटे आरामात एका सिनेमागृहात चित्रपट पाहत होते, त्‍याचवेळी पोलिसांनी त्‍यांना बेड्या घातल्‍या. नांदगावपेठ पोलिसांनी या चोरट्यांना अवघ्‍या काही तासांमध्‍ये हुडकून काढण्‍यात यश मिळवले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नांदगावपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिझिलँड या व्यापारी संकुलातील दहा दुकाने फोडून ६३ हजार ५०० रुपये लांबविणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. या प्रकरणात एका विधीसंघर्षित बालकालादेखील ताब्यात घेण्यात आले. मयूर किशोर सोळंके (१८) व रोहित चंदूलाल विश्वकर्मा (२१, दोघेही रा. जुना कॉटन मार्केट परिसर, अमरावती) अशी चोरांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांना येथील एका चित्रपटगृहातून ताब्यात घेतले.

हेही वाचा – जीवघेण्या प्रवेशातून होणार सुटका! यवतमाळ शहराबाहेर राष्ट्रीय महामार्गावर तीन उड्डाणपूल प्रस्तावित

बिझिलँड व्यापारी संकुलातील दहा दुकाने फोडून त्यातील आठ दुकानातून ६३ हजार ५०० रुपयांची रोकड लांबविण्यात आली होती. ही घटना उजेडात आल्यावर रवी खेमचंदानी (४२, रा. सिंधी कॅम्प) यांनी नांदगाव पेठ ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास आरंभला. गुन्हे शाखेचे युनिट एकही या गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते. तपासादरम्यान हा गुन्हा हा मयूर सोळंके व त्याच्या साथीदारांनी केल्‍याची आणि ते सध्या एका चित्रपटगृहात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारावर मयूर सोळंके व रोहित विश्वकर्मा या दोघांना चित्रपटगृह परिसरातून अटक करण्यात आली. सोबतच विधीसंघर्षित बालकालाही ताब्यात घेण्यात आले.

हेही वाचा – अयोध्‍येला जाणार अमरावतीच्या कुंकवाचा करंडा; पाचशे किलो कुंकू पाठवण्‍याचा संकल्‍प

चौकशीदरम्यान त्या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. अंगझडतीमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेल्या मयूर सोळंके याच्याजवळ एक चायना चाकूसुद्धा आढळून आला. त्यांच्याकडून चायना चाकू, रोख ९ हजार ६० रुपये व दोन मोबाइल असा एकूण २९ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश झोपाटे, राजूआप्पा बाहेनकर, फिरोज खान, सतीश देशमुख, दिनेश नांदे, विकास गुडदे, सूरज चव्हाण, निखिल गेडाम, निवृत्ती काकड, अमोल मनोहर, भूषण पद्मणे, किशोर खेंगरे यांनी केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thieves who stole from ten shops were arrested by nandgaonpeth police mma 73 ssb
Show comments