लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : नागपूर येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचा (एमएनएलयु) तिसरा दीक्षांत समारंभ शनिवारी विद्यापीठाच्या वर्धा मार्गावरील वारांगा परिसरात पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून न्या.संजीव खन्ना उपस्थित होते. सरन्यायाधीश खन्ना यांनी वाद संपुष्टात आणण्याबाबत मोठे विधान केले. सर्व प्रकारचे वाद मिटविण्यासाठी न्यायालय हे योग्य ठिकाण नाही, असे परखड मत न्या.खन्ना यांनी व्यक्त केले.

काय म्हणाले सरन्यायाधीश?

ज्याप्रकारे समस्यांना एका चौकटीत मोडता येत नाही, अगदी त्याच प्रकारे त्यांच्या समाधानाला एका चौकटीत ठेवता येत नाही. समस्या नवे रूप धारण करत आहे, त्यामुळे त्यांच्या निराकरणासाठी आपल्याचा लवचिक असणे आवश्यक झाले आहे. सर्व वाद न्यायालयीन खटल्यांसाठी योग्य नाही. मध्यस्थीच्या माध्यमातून समस्यांचे निराकरण यावर योग्य पर्याय आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी व्यक्त केले.

‘वाद संपुष्टात आणण्यासाठी मध्यस्थी हा सर्वोत्तम पर्याय आहे. यामुळे हो किंवा नाहीच्या पलीकडे जाऊन सर्जनशील उत्तरे मिळविली जाऊ शकतात. यामाध्यमातून केवळ वाद मिटत नाही तर लोकांमधील संबंध अधिक बळकट करण्यात मदत मिळते. न्यायाच्या पारंपारिक पद्धतीच्या पलीकडे जाऊन वेळेत आणि किफायतशीर न्याय मिळविण्यात मदत होईल, असे न्या. संजीव खन्ना म्हणाले. कायदा हा लोकांच्या समस्यांशी निगडित विषय आहे. लोकांप्रमाणे त्यांच्या समस्यांचे स्वरुपही वेगवेगळे असू शकते. प्रत्येक खटल्याला मानवी पैलू देखील असतात. यात कुटुंबातील संपत्तीचा वाद असो किंवा समुदायांचा मूलभूत हक्कांसाठी संघर्ष, यावर कायद्याच्या तसेच मानवी दृष्टीकोनातून उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचेही न्या.खन्ना यांनी सांगितले.

संघर्षातून मिळाले विधी विद्यापीठ

सर्वोच्च न्यायालयाचे भावी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नागपूरमध्ये विधी विद्यापीठाच्या निर्मितीच्या आठवणींना उजाळा दिला. सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन न्या.विकास सिरपूरकर यांच्यामुळे नागपूरमध्ये राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या स्थापनेची संकल्पना पुढे आली. त्यावेळी राष्ट्रीय विधी विद्यापीठ स्थापित करण्यासाठी मुंबई आणि औरंगाबादमध्ये संघर्ष होता. या संघर्षाचा नागपूरला फायदा झाला आणि राज्यात तीन राष्ट्रीय विधी विद्यापीठ स्थापित करण्याचा निर्णय झाला. नागपूरचे विधी विद्यापीठाचे संकुल देशातील सर्वोत्तम विधी विद्यापीठांपैकी एक आहे, असे गौरवोद्गार न्या.भूषण गवई यांनी काढले.

आदिती बैसला सात पदके

दीक्षांत समारंभात आदिती बैस या विद्यार्थीनीने सर्वाधित सात पदके प्राप्त केली. विश्वजीत राव आणि आकांक्षा बोहरा यांना विद्यापीठ सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले. याशिवाय समर्थ भारद्वाज, अभिमन्यु पालीवाल, श्रृती मंडोरा, दिव्यांश निगम, ऋषिकेश पाटील, हर्षदा नंदेश्वर, प्रज्ञा संचेती, शबनम शेख आणि वंजुल सिन्हा या विद्यार्थ्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. दीक्षात समारंभात पीएचडी धारकांचाही सन्मान करण्यात आला.