नागपूर : राज्यात सध्या करोना नियंत्रणात आहे. परंतु करोनाच्या पहिल्या दोन लाटेमध्ये रुग्णांच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण २.११ टक्के होते. ते तिसऱ्या लाटेत मात्र १ जानेवारी २०२२ ते १ एप्रिल २०२२ दरम्यान ०.५२ टक्केच असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकात्मिक रोग सव्‍‌र्हेक्षण कार्यक्रम अहवालातून पुढे आले आहे.
राज्यात १ जानेवारी २०२२ ते १ एप्रिल २०२२ या तिसऱ्या लाटेच्या काळात करोनाच्या ११ लाख ९५ हजार ३२६ रुग्णांचे निदान झाले. उपचारांदरम्यान या काळात ६ हजार २५९ रुग्णांचा मृत्यू झाला. हे मृत्यूचे प्रमाण ०.५२ टक्के होते. करोनाचा पहिला रुग्ण आढळलेल्या मार्च २०२० ते ३१ डिसेंबर २०२१ दरम्यान राज्यात करोनाचे ६६ लाख ७८ हजार ८२१ रुग्ण आढळले होते. यापैकी १ लाख ४१ हजार ५३३ रुग्णांचा मृत्यू झाला. हे मृत्यूचे प्रमाण २.११ टक्के होते. लसीकरणामुळे नागरिकांमध्ये करोनाविरोधात लढण्याचे प्रतििपड तयार झाल्याने मृत्यू कमी झाल्याचा वैद्यकीय क्षेत्राचा अंदाज आहे. दरम्यान, मार्च २०२० ते १ एप्रिल २०२२ पर्यंत राज्यात करोनाच्या ७८ लाख ७४ हजार १४७ रुग्ण आढळले. यापैकी १ लाख ४७ हजार ७८५ रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यूचे हे प्रमाण १.८७ टक्के एवढे आहे.