चंद्रपूर : भद्रावती आयुध निर्माणी वसाहतीत बिबट्याच्या हल्ल्यात विधीशा विनोद गायकवाड ही तेरा महिन्यांची बालिका गंभीर जखमी झाली. ही घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली. प्राथमिक उपचारानंतर तिला घरी पाठवण्यात आले. बिबट्याच्या हल्ल्यात बालिका जखमी झाल्याची ही गेल्या दहा दिवसांतील दुसरी घटना आहे. त्यामुळे निर्माणी वसाहतीतील पालकवर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.

हेही वाचा >>> बुलढाण्यात भरदिवसा एक लाखाचे दागिने लंपास, घटना CCTVमध्ये कैद; तपास सुरू

निर्माणी वसाहतीतील सेक्टर २ क्वार्टर नंबर २४ बी मध्ये विनोद गायकवाड राहतात. त्यांची तेरा महिन्यांची विधीशा ही मुलगी मंगळवारी सायंकाळी घराबाहेर खेळत होती. त्याचवेळेस बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. त्यात तिला किरकोळ दुखापत झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी शेंडे यांनी घटनास्थळाला भेट देऊन आवश्यक ती कार्यवाही केली. आयुध निर्माणी वसाहतीतील रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर तिला घरी पाठवण्यात आले आहे. दरम्यान, गेल्या दहा दिवसांच्या अगोदर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात वसाहतीतील एक बालिका किरकोळ जखमी झाली होती.

Story img Loader