नागपूर : शरद पवार यांच्याशी आमचा वैचारिक विरोध असला तरी त्यांना राज्यात काहीही त्रास होणार नाही. एवढी काळजी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील. हे उद्धव ठाकरेंचे सरकार किंवा महाविकास आघाडीचे सरकार नाही, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे आमदार निलेश राणे यांनी येथे केली.
निलेश राणे नागपूरला आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. शरद पवार महाराष्ट्राचे नेते आहेत, त्यामुळे त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि ती सरकार घेत आहे. आम्ही काही उद्धव ठाकरेसारखे घरी बसून राज्याचा कारभार चालवत नाही, महाविकास आघाडी सरकारच्या काळातही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आली होती. मात्र आम्ही असे करणार नाही, असे राणे म्हणाले.
हेही वाचा – नागपूरमध्ये वाळू आता एका क्लिकवर, माफियांची मक्तेदारी संपणार
संजय राऊत यांना धमकी कोण देऊ शकते. तेच तर दुसऱ्यांना धमक्या देतात. त्यांना सुरक्षा देण्यासाठी ते कोण आहेत, असा प्रश्नही राणे यांनी उपस्थित केला. सुनील राऊत यंना धमकी कोणाकडून आली, हे विचारा, कारण मुंबईतील एक डॉक्टर महिला ही संजय राऊत यांच्या मागे पडली आहे. कारण राऊत हे तिला धमकी देतात. त्या महिलेकडून तर संजय राऊत यांना धमकी नाही ना आली. याचे उत्तर राऊत यांनी द्यावे, असेही राणे म्हणाले.
हेही वाचा – ‘एल निनो’ यंदाही वातावरणाचे गणित बिघडवणार? वाचा काय म्हणते अमेरिकेची संस्था….
२०२४ ला विनायक राऊत खासदार नसणार आणि संजय राऊत बाहेर नसणार. मग सत्ता कुठून येणार. टोल नाक्यावर बसून चर्चा करून सत्ता येत नाही. संजय राऊत विरोधात पत्राचाळ प्रकरण आहे. करोना केंद्र घोटाळ्याचे प्रकरण आहे. एका महिलेने तक्रार दिली आहे, त्यांच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार आहे. कोणत्या प्रकरणात ते आत जातील, हे येणाऱ्या काळात ठरेल, अशी टीका राणेंनी केली. औरंग्याला चाटण्याचे काम अबू आजमी आणि महाविकास आघाडीचा मुंब्राचा आमदार करतो, असेही राणे म्हणाले.