वर्धा : धोंड्याचा महिना, आखाडी, अधिक मास म्हणून पाळला जाणारा हा काळ. नवविवाहित मुली माहेरी येण्याच्या लगबगीत भाऊरायाची चातका सारखी वाट बघतात. यावेळी १८ जुलै ते १६ ऑगस्टपर्यंत हा काळ आहे. अधिक मासाचे स्वामी म्हणून भगवान विष्णूचा मान असतो. मुलगी व जावई हे लक्ष्मी नारायण म्हणून पुजल्या जातात.
या महिन्यात दोघांना पाहुणचार केल्या जातो. तसेच जावयास धोंडा म्हणजे सोन्याचा दागिना आपापल्या ऐपतीप्रमाणे दिल्या जातो. चांदीचे दिवे, गोफ, तबक किंवा भांडी स्वरूपात भेट दिल्या जाते. कपडेलत्ते केल्या जातात. अधिक मासात दान देण्याची प्रथा आहे. तोपण संदर्भ या काळास असल्याने जावई बापू अग्रक्रमावर असतात. अशी दानाची पार्श्वभूमी असल्याने या हंगामात सोने बाजार गरम असतो.
वेगवेगळ्या तऱ्हेचे दागिने सुवर्ण पेढी तयार करून ठेवतात. सुवर्णकार सचिन वितोंडे म्हणतात की सध्या सोनं व चांदीच्या भावात घसरण झाली आहे. सोन्यात अडीच हजार तर चांदित दहा टक्क्यांनी घसरण आहे. त्यामुळे जावयासाठी वाण घेणे सोयीचे ठरणार. सोन्याचा धोंडा किंवा अन्य स्वरूपात दान देण्याची प्रथा आहे. म्हणून म्हणतात की आला अधिक मास, जावयास मिळणार गोडाचा घास.