लोकसत्ता टीम

भंडारा : लाखनी हे शिक्षणाचे माहेरघर समजले जात असून यावर्षी प्रथमच बारावी परीक्षेच्या केंद्रांमध्ये बदल करण्यात आला आहे. लाखनीतील तिन्ही मुख्य परीक्षा केंद्रांवरील विद्यार्थ्यांना अदलाबदल करून दुसऱ्या केंद्रावर परीक्षा देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना आपल्या परिचित केंद्रावर परीक्षा देता येत नसल्याने काही प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

नागपूरवरून अनेक विद्यार्थी लाखनीमध्ये ये-जा करीत आहेत. अशा परिस्थितीत, होम सेंटर न मिळाल्यामुळे आणि परीक्षा केंद्रे कॉपीमुक्त राहिल्याने काही विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. लाखनीतील नामांकित महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेतील परीक्षा १७ नंबरच्या फॉर्मद्वारे भरली असून, त्यांना दुसऱ्या केंद्रावर परीक्षा द्यावी लागत आहे.

यावर्षीच्या परीक्षांमध्ये कठोर नियंत्रण असल्याचे दिसून येत आहे. काही पालक आपल्या पाल्यांना परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी शिक्षक आणि केंद्रप्रमुखांच्या संपर्कात असल्याचेही आढळून येत आहे. पूर्वी शिक्षक विद्यार्थ्यांना नकल करण्यापासून परावृत्त करायचे, परंतु आता काही पालक स्वतःच या प्रकरणात हस्तक्षेप करत असल्याचे चित्र दिसून येते.

दरम्यान, लाखनी परिसरातील काही केंद्रांवर नकल प्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून परीक्षा केंद्रे कॉपीमुक्त ठेवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. त्यामुळे काही पालक अस्वस्थ झाले असले तरी गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ही बाब सकारात्मक असल्याचे शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे.

Story img Loader