अकोला : वाजतगाजत गणरायाचे आगमन आज होत आहे. गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण असून जोमाने तयारी करण्यात आली. यंदा गणेशोत्सवावर महागाईचे विघ्न असून मूर्तीच्या किंमतीत २० टक्क्यांहून अधिकने वाढ झाली. कच्चा मालाच्या भाववाढीचा परिणाम झाला. मातीच्या मूर्तीच्या तुलनेत पीओपीच्या मूर्ती कमी दरात उपलब्ध असल्या तरी गणेशभक्तांचा पर्यावरणपूरक गणेशमूर्तींकडेच ओढा दिसून येतो.
बाप्पांच्या आगमनाची सर्वच जण आतुरतेने वाट पाहत आहेत. भक्तांना गणेशोत्सवाचे वेध लागले असून शहरातील मुख्य ठिकाणी गणेश मूर्ती केंद्र थाटले आहेत. ढोल पथकांची जय्यत तयारी केली. अकोला शहरात गणेश मूर्ती बनवणारे अनेक मूर्तीकार आहेत. हजारो गणेश मूर्ती साकारल्या गेल्या आहेत. अकोला शहरातून इतर राज्यात सुद्धा मूर्ती पाठवल्या जातात. अगदी लहान मूर्तीपासून तर २५ फुटापर्यंत उंचीच्या मूर्ती तयार झाल्या आहेत. यावर्षी गणेशमूर्तींच्या किमतीत मोठी वाढ झाली.
हे ही वाचा…बुलढाणा : नितेश राणेंच्या अटकेच्या मागणीसाठी भर पावसात हजारो मुस्लिम बांधव रस्त्यावर!
मूर्ती बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाली. त्यामुळे गणेशमूर्तींच्या किमतीत २० टक्क्याहून अधिकने वाढल्या आहेत. सार्वजनिक मंडळाच्या वतीने मोठमोठ्या गणेश मूर्ती यांची मागणी वाढल्याचे मूर्तिकारांनी सांगितले. घरगुती गणेशमूर्ती ३०० रुपयांपासून तीन हजार रुपयांपर्यंतच्या उपलब्ध आहेत. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मोठ्या मूर्ती पाच हजारपासून ते लाखाे रुपयांपर्यंतच्या मूर्ती आहेत.
राजस्थानवरून येते माती
गणेशमूर्ती बनविण्यासाठी लागणारी माती राजस्थानवरून येते. त्याच्या किंमती वाढल्या आहेत. मूर्ती बनविण्यासाठी औष्णिक विद्युत केंद्रातील राखेचा देखील वापर करण्यात येतो. केंद्रातून राख नि:शुल्क देण्यात येत असली तरी मध्यस्थी, दलाल त्याची विक्री करतात. मूर्तिकारांना राख उपलब्ध होण्यात अडचण झाली. अनेकांना महागड्या दराने राख घ्यावी लागली. मूर्तींना देण्यात येणाऱ्या रंगाच्या किंमतीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली. इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च देखील वाढला आहे. यासर्वचा परिणाम मूर्तींच्या किंमतीवर झाला, अशी माहिती मूर्तिकारांनी दिली.
हे ही वाचा…नागपूर: ओबीसी वसतिगृह सुरू करण्यासाठी आणखी एक तारीख, मंत्र्यांविरुद्ध नाराजी
पर्यावरण गणेशोत्सवाकडे कल
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी विविध सामाजिक संघटना, शाळांच्यावतीने शाडूच्या मातीपासून मूर्ती बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत. त्याकडे देखील विद्यार्थ्यांचा कल दिसून येत आहे. मातीच्या गणेशमूर्तीच्या तुलनेत पीओपीच्या मूर्तींच्या किंमत कमी आहे. पीओपी पर्यावरणासाठी धोकादायक ठरत असल्याने मातीच्या मूर्तींकडेच नागरिकांचा अधिक कल दिसत आहे.
हे ही वाचा…सिलेंडरचा स्फोट, कंपनीतील वायू गळती रोखणारे नेमके संशोधन काय?
सजावटीचे आकर्षण
सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी देखील गणेशभक्तांनी बाजारपेठेत गर्दी केली. गणेश मूर्तीबरोबरच आकर्षण सजावट करण्याकडे भाविकांचा कल आहे. गणपतीचे मखर, विद्युत माळा, फुलांच्या माळा व इतर साहित्य सजावटीसाठी उपलब्ध आहे. सजावट साहित्याच्या किंमतीत देखील मोठी वाढ झाली.