चंद्रपूर : सुधीर मुनगंटीवार पालकमंत्री असताना सलग साडेसात वर्षे जिल्ह्याला कोट्यवधींचा निधी मिळाला. यंदाच्या अर्थसंकल्पात मात्र जिल्ह्याला एक नवा पैसा देण्यात आलेला नाही. चंद्रपूरसाठी एकही नवी योजना वा प्रकल्पाची घोषणा नाही. हे पालकमंत्र्यांसह जिल्ह्यातील भाजपच्या पाचही आमदारांचे अपयश असल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील मतदारांनी मुनगंटीवार, कीर्तीकुमार भांगडिया, किशाेर जोरगेवार, देवराव भोंगळे आणि करण देवतळे हे भाजपचे पाच आमदार निवडून दिले.

यामुळे चंद्रपूरचे मूळ रहिवासी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्याला मंत्रिमंडळ व अर्थसंकल्पात स्थान देतील, अशी आशा प्रत्येकाला होती. मात्र, सर्वप्रथम मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आला. आता अर्थसंकल्पात भोपळा मिळाला. पाचही आमदारांना विकासकामांसाठी निधी खेचून आणण्यात अपयश आले. पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनीही जिल्ह्याला विकासासाठी निधी मिळावा यासाठी प्रयत्न केल्याचे ऐकिवात नाही.

मुनगंटीवार यांनी झरपट नदी सौंदर्यीकरण, वीर बाबुराव शेडमाके क्रीडांगण, पोंभूर्णा एमआयडीसी यांसह विविध कामांसाठी निधीची मागणी लावून धरली. परंतु यापैकी एकाही कामाची अर्थसंकल्पात तरतूद नाही. जिल्ह्यातील अनेक विकासकामे अपूर्ण अवस्थेत आहे. त्यासाठीही निधी दिला गेला नाही. मुनगंटीवार यांच्याप्रमाणेच भांगडिया, जोरगेवार, भोंगळे, देवतळे यांच्याही मतदारसंघासाठी नवा पैसा दिला गेला नाही. हे पूर्णत: आमदारांचे अपयश आहे, अशी टीका आता होत आहे.

भाजपमध्ये गटबाजी !

जिल्हा भाजपमध्ये सध्या चार गट पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आधी मुनगंटीवार आणि मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर असे दोन गट होते, आता त्यात जोरगेवार आणि पालकमंत्री उईके या दोन गटांची भर पडली आहे. पालकमंत्री उईके आणि काँग्रेस खासदार यांची छुपी युती असल्याची चर्चा सुरू आहे. ही छुपी युती आणि अंतर्गत गटबाजीची माहिती वरिष्ठांपर्यंत पोहोचल्याने अर्थसंकल्पावर त्याचा परिणाम झाला असावा, अशी चर्चा आहे.

Story img Loader