नागपूर : भाजपाने विचारपूर्वकच राज्यसभेसाठी तीन उमेदवार उभे केले होते. आमदारांच्या सद्सदविवेक बुद्धीच्या आधारावर आमचा तिसरा उमेदवार निवडून आला. आता विधान परिषदेसाठीही आम्ही चमत्कारासाठी पाचवा उमेदवार उभा केला नाही, तर त्याच्या विजयासाठी नियोजन केले आहे. त्यामुळे आम्हीच विजयी होऊ, असे मत भाजपचे वरिष्ठ नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे व्यक्त केले. ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा >>> “अग्नीपथ ही तरुणांना अग्नीत ढकलण्याची योजना”, कन्हैया कुमारचं केंद्र सरकारवर टीकास्त्र

भारतीय जनता पक्ष विजयसाठी निवडणूक लढवतो. ज्यांनी आमच्याशी विश्वासघात करून राज्यात सत्ता स्थापन केली तेच लोक आमदारांनी विश्वासघात केला, अशी वक्तव्ये करीत आहेत. शिवसेनेचे आमदार जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करणार नाही, असे म्हणत असेल तर त्यात त्यांचे काही चुकले नाही,” असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

हेही वाचा >>> ‘अग्निपथ योजना मागे घ्या’; जंतरमंतरवर काँग्रेसचा ‘सत्याग्रह’

तसेच, “जनतेने त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात निवडून दिले आहे. शिवसेनेचा खरा आमदार कदापि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करू शकत नाही. ज्यांना खुर्चीचे प्रेम आहे आणि जे बाळासाहेबांचे विचार विसरले असतील तेच आघाडीच्या उमेदवाराला मतदान करतील, असेदेखील मुनगंटीवार म्हणाले.

हेही वाचा >>> अचानकपणे आग लागल्यामुळे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, १८५ प्रवासी थोडक्यात बचावले

दरम्यान, सोमवारी म्हणजेच २० जून रोजी विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी मतदान होणार आहे. या दहा जागांसाठी एकूण ११ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी गुप्त मतदान पद्धत असल्यामुळे घोडेबाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच कारणामुळे महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून खबरदारी घेतली जात आहे. शिवसेना, राष्ट्रवादी तसेच काँग्रेस या तिन्ही पक्षांनी आपले आमदार वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये ठेवले आहेत. तर भाजपानेदेखील आपल्या सर्व आमदारांना मुंबईत बोलावले असून त्यांना हॉटेल ताजमध्ये ठेवण्यात आले आहे. महाविकास आघाडी आणि भाजपाकडून विजयासाठी आकडेमोड सुरु आहे.